Dehuroad : शहरात 55 पैकी 22 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह

झोपडपट्टी भागात सर्वेक्षण सुरु

एमपीसी न्यूज : देहूरोड शहरातील शिवाजीनगर भागात केलेल्या सर्वेक्षणानंतर ‘हाय रिस्क’ आणि ‘लो रिस्क’ या वर्गवारीनुसार एकूण 55 नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले होते. यामधील 22  जणांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले दोन्ही रुग्ण पुण्यातील येरवडा  येथून  आलेले आहेत.  त्यामुळे स्थानिक  नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, अशी माहिती कॅन्टोन्मेंटच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी यांनी दिली.

देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील शिवाजीनगर भागात दोन लहान मुली कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य पथकाने परिसरातील नागरिकांचे सर्वेक्षण केले. त्यानुसार ‘हाय रिस्क’ आणि ‘लो रिस्क’ या वर्गवारीनुसार एकूण 55 नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले. यातील ‘हाय रिस्क’ मधील 21 जणांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात, तर काहींना अन्य पंडित नेहरू मंगल कार्यालयात व ‘लो रिस्क’मधील नागरिकांना होम क्वारंटाइन करण्यात आले. यातील 22  नागरिकांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

तर पंडित नेहरू मंगल कार्यालयात संस्थात्मक क्वारंटाइन केलेल्या 27  नागरिकांचा अहवाल पाहून त्यांना डिस्चार्ज द्यायचा किंवा नाही याचा निर्णय उद्या घेण्यात येणार आहे. मात्र, डिस्चार्ज दिला तरी त्यांना शासकीय निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल, असेही डॉ. जोशी यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांच्या मार्गदर्शनाखाली  कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून  सुरुवातीपासून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.  कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले दोन्ही रुग्ण पुण्यातील येरवडा  येथून  आलेले आहेत. त्यामुळे स्थानिक  नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असेही त्या म्हणाल्या.

शिवाजीनगर येथे दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर कॅन्टोन्मेंट हद्दीतील झोपडपट्टी भागात आरोग्य पथकाकडून घरोघरी जाऊन नागरिकांचे आरोग्‍यविषयक सर्वेक्षण करण्यात येत आहे. सध्या गांधीनगर, शितळानगर या भागात सर्वेक्षण सुरु आहे. झोपडपट्टी परिसरातील सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर अन्य भागात हे काम करण्यात येणार असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.