Dehuroad : दरोडा आणि आरोपीला अटक एकाच तारखेला, मात्र घटनेला उलटली 17 वर्ष

The robbery and the accused arrested on the same date, however reversed in 17 years : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाची कामगिरी, ज्वेलर्सच्या दुकानातून लुटले होते 21 तोळे सोने.

एमपीसी न्यूज – गेल्या 17 वर्षांपूर्वी 29 जुलै 2003 या दिवशी ज्वेलर्सच्या दुकानावर धाडसी दरोडा टाकणा-या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी 29 जुलै 2020 रोजी अटक केली आहे. तारखेचा हा निव्वळ योगायोग असून आरोपीवर राज्यभरात एकूण 20 गुन्हे दाखल आहेत.

रघुविरसिंग चंदुसिंग टाक (वय 51, रा. परतूर, जालना) असे अटक केलेल्या दरोडेखोराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी टाक आणि त्याच्या पाच साथीदारांनी मिळून 29 जुलै 2003 रोजी पहाटे सव्वा तीन वाजता धनराज केसरीमल सोनिगरा (रा. देहूरोड) यांच्या सोनिगरा ज्वेलर्सवर दरोडा टाकला होता.

या दरोड्यात आरोपींनी सोनिगरा यांच्या मुलीच्या गळ्याला चाकू लाऊन 21 तोळे सोन्याचे दागिने आणि साडेआठ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली होती.

याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास अजूनही सुरु होता. मात्र, आरोपी वेषांतर करून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटत होता.

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी त्याला जालना येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपी टाक याच्यावर राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 20 गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला पुढील कारवाईसाठी देहूरोड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी फारुक मुल्ला, राजीव ईघारे, दयानंद खेडकर, भरत माने यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.