Dehuroad : निगडी-देहूरोड मार्गावर अडवून दोघांना लुटले

The two were stopped on the Nigdi-Dehuroad road and robbed

एमपीसी न्यूज – निगडी-देहूरोड मार्गावरून घरी जात असलेल्या दोघांना जबरदस्तीने अडवून त्यांना मारहाण करत लुटले. ही घटना शुक्रवारी (दि. 14) पहाटे चार वाजता देहूरोड जकात नाक्याच्या पुढे देहूरोडकडील बाजूला घडली.

सुनील साधुराम टाक (वय 42, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चिनू उर्फ सिद्राम शरणाप्पा कोळी (वय 20, रा. तळेगाव दाभाडे) आणि त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी चिनू याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील आणि त्यांचा मित्र रमेश चंडालिया हे दोघेजण कामावरून घरी जात होते.

देहूरोड जकात नाक्याच्या पुढे आले असता एका कारमधून (एमएच 14 / एक्स 6494) चार आरोपी आले. त्यांनी फिर्यादी यांना लिफ्ट देण्याचा बहाणा केला. मात्र, फिर्यादी यांनी त्यास नकार दिला.

त्यानंतर आरोपींनी फिर्यादी सुनील यांच्या दुचाकीची चावी काढून घेतली. दुचाकी बाजूला लावायला सांगितली आणि ‘तुमच्या जवळ जेवढे पैसे आहेत, तेवढे काढून द्या’ अशी धमकी दिली.

इतर तीन जणांनी सुनील यांचा मित्र रमेश यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्यामुळे सुनील आणि रमेश यांनी त्यांचे मोबईल फोन आणि 300 रुपये काढून दिले. चोरट्यांनी एकूण 40 हजार 280 रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला. देहूरोड पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.