Dehuroad : मेडिकल दुकानदारावर वार करून रोकड लुटणा-या तीन सराईतांना अटक; पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचची कारवाई

एमपीसी न्यूज – मेडिकल दुकान बंद करून घरी जात असलेल्या दुकानदारावर धारदार शस्त्राने वार करून ५२ हजार रुपयांची रोकड लुटली. या गुन्ह्यातील तीन सराईत चोरट्यांसह दोन अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ४० हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

राहुल संजय टाक (वय १९, रा. देहूरोड), नंदकिशोर पांडुरंग गुंजाळ (वय १९, रा. विकासनगर, देहूरोड), अंकुर रमेश कारले (वय १९, रा. पाषाण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच दोन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीश भुंडाराम चौधरी यांचे रावेत येथील मुकाई चौकाजवळ बन्सल विस्टा इमारतीमध्ये वेल केअर नावाचे मेडिकल दुकान आहे. ते ११ सप्टेंबर रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास हे मेडिकल दुकान बंद करून घरी जात होते. त्यावेळी अचानक आलेल्या एका टोळक्याने जगदीश यांच्यावर धारदार हत्याराने वार केले. यामध्ये जगदीश जखमी झाले. टोळक्याने जगदीश यांच्या हातातील 52 हजार रुपये असलेली बॅग चोरून नेली. या घटनेनंतर आरोपी मोटारसायकल वरून पळून गेले. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

देहूरोड पोलिसांसोबत गुन्हे शाखा युनिट पाच या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. २१ सप्टेंबर रोजी पोलीस कर्मचारी फारूक मुल्ला आणि मयूर वाडकर यांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी श्रीनगर देहरोड येथील अण्णाचाळीत एका घरात येणार आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अण्णाचाळीत पोलिसांनी सापळा रचला. अण्णाचाळीतील एका घरात आरोपी मोठमोठ्याने गप्पा मारत बसले होते. पोलिसांचा सुगावा लागताच आरोपी पळून जाऊ लागले. पोलिसांनी शिताफीने पाच जणांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या सर्वांकडे चोरलेल्या रकमेबाबत विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांना गुन्हे शाखा युनिट पाचच्या कार्यालयात आणून कसून चेक्सही केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचे सांगितले. तसेच आरोपी राहुल, अंकुर आणि एका अल्पवयीन मुलाने मिळून एक महिन्यापूर्वी रावेत येथील डी मार्ट येथून एम एच १४ / एफ पी ०८९७ ही दुचाकी चोरल्याचे सांगितले. या कारवाईमुळे दोन गुन्हे उघडकीस आले असून आरोपींना देहूरोड पोलिसांकडे पुढील कारवाईसाठी देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी फारूक मुल्ला, मयूर वाडकर, धनराज किरनाळे, संदीप ठाकरे, दत्तात्रय बनसुडे, स्वामीनाथ जाधव, धनंजय भोसले, राजकुमार ईघारे, भरत माने, ज्ञानेश्वर गाडेकर, श्यामसुंदर गुट्टे, दयानंद खेडकर, ब्रह्मांदे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.