Dehuroad : लोहमार्गावरील उड्डाणपुलाचे काम रखडल्याने महामार्गावर वाहतूककोंडी

एमपीसी न्यूज – देहूरोड येथे लोहमार्गावरील उड्डाणपुलाचे काम रखडल्याने तसेच खड्डेमय रस्त्यामुळे जुना पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोडजवळ वाहतूककोंडी होत आहे. देहूरोडजवळ लोहमार्गाच्या उड्डाणपुलाजवळ खड्डे चुकवण्यासाठी वाहनचालक कसरत करीत आहेत. त्यामुळे अपघातांना आमंत्रण मिळत आहे.

जुना पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड वसलेले आहे. देहूरोडमधून महामार्ग जात असल्याने इथे वाहतूककोंडी नित्याची बाब बनली. त्यावर तोडगा काढण्यासाठी महामार्गावर उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन झाले. देहूरोड सुरु होण्याआधी सुरु होणार उड्डाणपूल देहूरोड संपल्यानंतर जमिनीवर येतो. देहूरोडभर पसरलेला उड्डाणपूल तयार झाल्यामुळे देहूरोडमधील वाहतूककोंडीतून वाहनचालकांना मुक्ती मिळाली.

  • देहूरोड रेल्वे स्थानकाजवळून हा अउड्डाणपूल जात असल्याने लोहमार्गावर देखील एक उड्डाणपूल बांधणे आवश्यक होते. लोहमार्गावर अगोदरच एक उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरु असून आणखी एक उड्डाणपूल बांधणे आवश्यक होते. देहूरोडमधील उड्डाणपूल बांधून वाहतुकीसाठी खुला झाला. मात्र, लोहमार्गावरील उड्डाणपूल तयार न झाल्याने दोन्ही मार्गावरील वाहतूक एकाच मार्गावरून होत आहे. यामुळे वाहतूककोंडीला आमंत्रण मिळत आहे. दररोज सकाळ-संध्याकाळी वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्याचे चित्र इथे पाहायला मिळते.

उड्डाणपुलाच्या सुरुवातीला निगडीकडील बाजूला रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. या खड्ड्यातून वाहन चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

  • एखादा खड्डा चुकवण्यासाठी समोरच्या कारचालकाने ब्रेक लावल्यास मागून येणारी कार धडकण्याचे प्रकार इथे वारंवार घडत आहेत. यामुळे शाब्दिक वाद, वाहनांचे नुकसान आणि वाहतूककोंडी होत आहे. लोहमार्गावरील उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर करावे. तसेच रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.