Dehuroad : पुण्यातील ‘हॉटस्पॉट’ राहून आलेल्या कुटुंबातील दोन मुली कोरोनाबाधित; देहूरोडमध्ये ३ मेपर्यंत कडकडीत लॉकडाऊन

एमपीसी न्यूज : पुणे, पिंपरी चिंचवडनंतर आता देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पुण्यातील कोरोना ‘हॉटस्पॉट’ असलेल्या भागात राहून आलेल्या शिवाजीनगर येथील दोन लहान मुलींचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे या भागात कॅन्टोन्मेंट प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने सर्वेक्षण करून तेथील ‘हायरिस्क’ आणि ‘लो रिस्क’मधील व्यक्तींना क्वारंटाइन कारण्यात आल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देहूरोडच्या शिवाजीनगर झोपडपट्टीत कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या वतीने सर्वेक्षण सुरु होते. पुण्यातील येरवडा, लक्ष्मीनगर या कोरोना हॉटस्पॉट असलेल्या भागातून भाजीच्या टेम्पोत बसून सोमवारी ( दि. 27) शिवाजीनगर येथील एका कुटुंबात काही व्यक्ती आल्याचे आढळून आले. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या वैद्यकीय पथकाने त्यांना तात्काळ पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. आज (बुधवारी) या कुटुंबातील दोन मुलींचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला. त्यानंतर कॅन्टोन्मेंट प्रशासन आणि देहूरोड पोलिसांच्या मदतीने शिवाजीनगर भागात सर्वेक्षण करून तेथील ‘हायरिस्क’ आणि ‘लो रिस्क’मधील व्यक्तींना क्वारंटाइन कारण्यात आले. संबंधित मुली येरवड्यात आजोळी राहिल्या होत्या, त्या कुटुंबात पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेला असताना त्यांना देहूरोडमध्ये घेऊन येण्याचा निर्णय त्यांच्या पालकांनी घेतलाच कसा, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. बाहेरून शहरात येणाऱ्या लोकांवर बारीक लक्ष ठेवण्याची आवश्यकता या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.

मावळ तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या देहूरोड येथील शिवाजीनगरमध्ये दोन अल्पवयीन मुलींना करोना झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी यांनी रोजी दिली. मावळात कोरोनाचा अद्यापही एकही रुग्ण सापडला नसून देहूरोड येथे रुग्ण सापडल्याने मावळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देहूरोड येथील शिवाजीनगर परिसर सील केला असून त्यांच्या संपर्कातील व्यक्ती व नातेवाईकांची तपासणी करण्याचे काम सुरू आहे.

डॉ. सुनीता जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार देहूरोड येथील शिवाजीनगर परिसरातील एक पाच वर्षे व दुसरी 11 वर्षे वयाची मुलगी येरवडा पुणे येथे नातेवाईकांकडे मागील ३ आठवड्यांपूर्वी गेली होती. त्या मुलीच्या कुटुंबाची तपासणी सोमवारी (दि.27) केली. त्यात संशय आल्याने पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात कोरोना तपासणी केली असता, त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य वायसीएम रुग्णालयात क्वारंटाईनमध्ये आहेत.
लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करा – सुनील शेळके
 मावळच्या जनतेला घरातच रहा, मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, अनोळखी व्यक्तींपासून अंतर राखा. ही लढाई जिंकणार आहोत, शासनाचे नियम काटेकोर पणे पालन करा. असे कळकळीचे आवाहन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले आहे.
पुणे-मुंबई  महानगरांच्या मध्ये असलेल्या मावळ तालुक्यात अद्यापही कोरोना रुग्ण सापडलेला नाही, पण देहूरोड परिसरात रुग्ण सापडल्याने मावळ परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे कडक पालन करणे अत्यावश्यक आहे, असे आमदार शेळके म्हणाले.

पिंपरी चिंचवड परिसरात दिवसेंदिवस कोरोनाचे  रुग्ण सापडत असून मावळातील दुग्ध व्यावसायिक तसेच भाजी पाला विक्रेते ये – जा करतात. त्यांच्यावर बंधन घालण्याची मागणी नागरिक करत आहेत.

मावळ तालुका आरोग्याधिकारी डॉ चंद्रकांत लोहारे म्हणाले, मावळातील नागरिकांनी सहकार्य करावे. घरोघरी तपासणीसाठी येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेवकांना सहकार्य करावे. लॉक डाऊनचे नियम पाळा.

देहूरोडमध्ये तीन मेपर्यंत कडकडीत लॉकडॉऊन

देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ३० एप्रिल ते ३ मेपर्यंत कडकडीत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या कालावधीत केवळ मेडिकल, हॉस्पिटल आणि दूध विक्री वगळता अन्य दुकाने बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.

– रामस्वरूप हरितवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.