Dehuroad : जकात पावती फाडण्याच्या कारणावरून कॅबचालकाला मारहाण; प्रवासी जखमी

एमपीसी न्यूज – जकात नाक्यावरील पावती फाडण्याच्या कारणावरुन दोघांनी कॅब चालकाला मारहाण केली. कॅबच्या काचा फोडून नुकसान केले. यामध्ये कॅबमध्ये बसलेला प्रवासी जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. 17) दुपारी दोनच्या सुमारास देहूरोड कॅन्टोन्मेंट जकात नाक्यावर घडली.

अमेश मितीन गुप्ते (वय 35, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विनोद मकवाना व त्याच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमेश निगडीतून तळेगावकडे कॅबमधून जात होते. पुणे-मुंबई जुना महामार्गावर असलेल्या देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जकात नाक्यावर दोन आरोपिंनी कॅब अडवली. दोघांनी कॅब चालक निलेश हनुमंत गोयल याच्यासोबत जकात पावती फाडण्यावरून शिवीगाळ करून मारहाण केली. आरोपींनी निलेशला लाकडी दांडक्याने मारहाण केली.
तसेच कॅबच्या काचा फोडून कारचे नुकसान केले. कारच्या काचेचे तुकडे अमेश यांच्या मानेवर लागल्याने ते जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.