Dehuroad Crime News : कामावरून काढून टाकल्याच्या रागातून अधिकाऱ्याच्या कारची तोडफोड

अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – देहूरोड आयुध निर्माणी या कारखान्यातून कामावरून काढून टाकल्याच्या कारणावरून सहा जणांनी मिळून कंपनीतील एका अधिका-याच्या कारचा पाठलाग केला. कार अडवून दमदाटी करत कारवर दगडफेक केली. तसेच अधिका-याला जीवे मारण्याची धमकी दिली.

ही घटना सोमवारी (दि. 8) रात्री सायंकाळी सात वाजता निगडी-देहूरोड मार्गावर आयुध निर्माणीच्या गेटवर घडली.

बाजीराव टाळके, नितीन सुपारे, विक्रांत भोसले, गणेश हुंबे, तानाजी नरसळ, अशोक कदम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत बाळासाहेब सखाराम भांडवलकर (वय 47, रा. वडगाव बुद्रुक, ता. हवेली ) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भांडवलकर हे देहूरोड येथील आयुध निर्माणी या कारखान्यात अधिकारी पदावर काम करतात. त्यांनी कंपनीत कामगार कपात केली. तसेच कपात केलेल्या कामगारांना सर्व आर्थिक मोबदला देऊन कामावरून काढले.

त्याचा राग मनात धरून आरोपींनी भांडवलकर यांच्या कारचा दुचाकीवरून पाठलाग केला. दुचाकी कारला आडवी लावून भांडवलकर यांना अडवले.

त्यानंतर शिवीगाळ, दमदाटी करून कारला घेराव घातला. कारवर दगडफेक करून कारचे नुकसान केले. आरडाओरडा करून आरोपींनी दहशत पसरवली. ‘आता यांना गाडीतच मारायचे’ अशी जीवे मारण्याची धमकी आरोपींनी फिर्यादी भांडवलकर यांना दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.