Dehuroad : सोमवारपासून दररोज सहा तास भाजीपाला, किराणा विक्री सुरु राहणार : रामस्वरूप हरितवाल

एमपीसी न्यूज : भाजीपाला आणि किराणा खरेदीसाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी येत्या सोमवारपासून ( दि. ११) शहरातील भाजीपाला, किराणा चिकन-मटण व अन्य अत्यावश्यक सेवा सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप यांनी दिली. ही सवलत देताना दुकानदारांनी आणि नागरिकांनी सोशल डिस्टंसिन्गचे पालन करणे, सॅनिटायझर व मास्क वापरणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज ( बुधवारी) बोर्ड कार्यालयात कॅन्टोन्मेंट सदस्य आणि राजकीय पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत देहूरोड शहरात भाजीपाला आणि किराणा साहित्य खरेदीसाठी होणारी गर्दी कमी करण्याबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.

त्यावेळी बोर्ड सदस्य आणि राजकीय पक्षांच्या प्रमुखांची मते जाणून घेण्यात आली. तसेच त्यांनी केलेल्या मागण्यांनुसार भाजीपाला, किराणा, चिकन मटण आदींची विक्री सोमवारपासून दररोज करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अन्य अत्यावश्यक सेवाही शासकीय आदेशानुसार सुरु ठेवण्याचा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

कॅन्टोन्मेंट सदस्य हाजीमलंग मारीमुत्तू, विशाल खंडेलवाल, शिवसेना शहरप्रमुख भरत नायडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा दाभोळे, भाजपचे युवा नेते अमोल नाईकनवरे, मनसे शहराध्यक्ष जॉर्ज दास, पीआरपीचे शहराध्यक्ष परशुराम दोडमणी, आरपीआयचे शहराध्यक्ष सुनील गायकवाड, इंद्रपालसिंग रत्तू आदी बैठकीला उपस्थित होते. यापैकी मारीमुत्तू, खंडेलवाल, नायडू, दाभोळे यांनी बैठकीत आपल्या मागण्या मांडल्या.

चहाची दुकाने सुरु ठेवल्यास दंडात्मक कारवाई

देहूरोड शहरात काही चहा विक्रीची दुकाने सुरु असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. उद्यापासून चहाची दुकाने सुरु असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा सिईओ हरितवाल यांनी दिला आहे. तसेच सध्या रमजान महिना सुरु असल्याने बेकरीची दुकाने सुरु करण्यास त्यांनी संमती दिली. भाजीविक्री करणाऱ्या विक्रेत्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचा विचार सुरु आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल असेही सिईओ हरितवाल यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.