Dehuroad : किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – घरासमोरील नळाचा पाईप निघून पाणी तुंबले असल्याचे सांगितल्याचा राग मनात धरून महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 2) गांधीनगर, देहूरोड येथे घडली.

कांचन संतोष कुराडे (वय 30, रा. गांधीनगर, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नागप्पा कन्हैय्या कुराडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नागप्पा व फिर्यादी यांचे घर शेजारी असून ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपी व त्याची आई नळाला पाणी आल्याने पाणी भरत होते. त्यावेळी नळाला लावलेला पाईप व्यवस्थित न लावल्याने पाणीगळती होऊन रस्त्यामध्ये पाणी तुंबले.

फिर्यादीने ही गोष्ट आरोपी व त्याच्या आईला सांगितली. आरोपीने याचा राग मनात धरून फिर्यादी कांचन यांना शिवीगाळ करत पोर्टेबल बॅटरी डोक्यामध्ये फेकून मारली. त्यामुळे फिर्यादीच्या नाकास व कपाळास गंभीर जखम झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.