Dehuroad: गव्हाणी जातीच्या जखमी घुबडाला प्राणीमित्रांमुळे मिळाले जीवदान

एमपीसी न्यूज – देहूरोडमध्ये दारुगोळा कारखान्याच्या आवारात आढळून आलेल्या गव्हाणी जातीच्या जखमी घुबडाला दोन प्राणीमित्रांमुळे जीवदान मिळाले आहे. 

दारुगोळा कारखान्याच्या आवारात काल (शनिवारी) रात्री दुर्मिळ अशा गव्हाणी जातीचे एक घुबड जखमी अवस्थेत आढळले. सर्पमित्र अक्षय वाघमारे यांच्या मदतीने प्राणीमित्र रितेश साठे यांनी त्याची सुटका केली. त्यानंतर त्या घुबडाला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्याची माहिती देहूरोड पोलिसांना देण्यात आली.

या जखमी घुबडावर सध्या उपचार सुरू असून पूर्ण बरे झाल्यानंतर या घुबडाला निसर्गात पुन्हा सोडण्यात येणार आहे, अशी माहिती सर्पमित्र अक्षय वाघमारे यांनी दिली.

गव्हाणी घुबड किंवा कोठीचे घुबड हा पक्षी ध्रुवीय आणि वाळवंटी प्रदेश, आशियातील हिमालयाच्या उत्तरेकडील भाग, इंडोनेशिया आणि पॅसिफिक महासागरातील काही बेटे सोडली तर संपूर्ण जगात हा पक्षी आढळतो. भारतात याच्या दोन मुख्य उपजाती आहेत. याला मराठीमध्ये घो घो पिंजरा, पांजरा, छोटे घुबड, कानेल, चहारा अशी अनेक नावे आहेत.

गव्हाणी घुबड पक्षी हा साधारण ३६ सें. मी. आकाराचा आहे. पाठीकडून सोनेरी-बदामी आणि राखाडी रंगाचा त्यावर काळ्या-पांढर्‍या रंगाचे पट्टे असलेला, पोटाकडे मुख्यत्वे रेशमी पांढरा रंग त्यावर बदामी रंगाची झाक आणि गडद तपकिरी रंगाचे ठिपके असतात. याचे डोके गोलसर आकाराचे, काहीसे माकडासारखे असते. चेहर्‍याचा रंग पांढरा-बदामी आणि चोच बाकदार असते. नर-मादी दिसायला सारखेच असतात.

गव्हाणी घुबड संपूर्ण भारतभर तसेच पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार या देशांसह जवळजवळ संपूर्ण जगभर आढळणारा पक्षी आहे. भारतात याच्या दोन मुख्य उपजाती आहेत. हे पक्षी एकट्याने किंवा जोडीने जुन्या इमारती, किल्ले, कडेकपारी, शेतीचे प्रदेश येथे राहणे पसंत करतात. उंदीर, घुशी, सरडे, पाली हे यांचे मुख्य खाद्य आहे. या पक्ष्यांचा विणीचा निश्चित काळ नाही. जुन्या-पडक्या इमारतींच्या कोनाड्यात, झाडांच्या ढोलीत काड्या वापरून तयार केलेले घरटे जमिनीपासून उंच ठिकाणी असते. घरट्यांजवळ दिवसा सावली येऊ शकेल अशा ठिकाणी ते बांधलेले असते. एकच घरटे वर्षानुवर्षे वापरण्याची सवय या पक्ष्यांना असते. मादी एकावेळी पांढर्‍या रंगाची, गोलसर, ४ ते ७ अंडी देते.

भारतीय संस्कृतीत हे अपशकुनी मानले गेले आहेत परंतु इंग्लंडमध्ये मात्र गव्हाणी घुबड विद्वत्तेचे प्रतीक मानले गेले आहे.

(संदर्भ : विकीपिडिया)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.