Dehuroad: किरकोळ कारणावरून तरुणाचा जबडा फ्रॅक्चर; दोघांना अटक

पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

एमपीसी न्यूज – एकमेकांकडे खुन्नसने बघण्याच्या किरकोळ कारणावरून दोघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुणाचा जबडा फ्रॅक्चर झाला. याबाबत देहूरोड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 24) दुपारी साडेबारा वाजता साईनगर, देहूरोड येथे पीरबाबा मंदिराजवळ घडली.

पृथ्वीराज विनायक चव्हाण (वय 29, रा. साईनगर, देहूरोड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अश्विन भोसले (वय 28), रविराज भोसले (वय 26, दोघे रा. साईनगर, देहूरोड) या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास फिर्यादी चव्हाण हे त्यांचा मित्र सचिन आस्वले याच्यासोबत साईनगर, देहूरोड येथे पीरबाबा मंदिराजवळ गप्पा मारत थांबले होते.

त्यावेळी आरोपी तिथे आले. ‘मला खुन्नसने का बघतो’ असे म्हणत आरोपींनी चव्हाण यांना शिवीगाळ केली. चव्हाण यांनीही आरोपींना शिवीगाळ केली. याचा राग आल्याने आरोपींनी चव्हाण यांना ठोशा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात चव्हाण यांचा जबडा फ्रॅक्चर झाला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.