Dehuroad : विक्रीसाठी पिस्टल बाळगणा-या तरुणाला अटक; तीन पिस्टल, सहा काडतुसे जप्त

Youth arrested for selling pistol; Three pistols, six cartridges seized

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचची कारवाई

एमपीसी न्यूज – देशी बनावटीच्या पिस्टलची विक्री करण्यासाठी पिस्टल बाळगणा-या एका तरुणाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट पाचने अटक केली आहे. त्याच्याकडून तीन देशी बनावटीच्या पिस्टल आणि सहा जिवंत काडतुसे,  असा एक लाख 59 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सचिन महादेव जाधव (वय 26, रा. खडखडवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे यांना शुक्रवारी (दि. 5) दुपारी माहिती मिळाली की, एक इसम सोमाटणे फाटा येथे देशी बनावटीचे पिस्टल विक्रीकरीता घेवून येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन पथके तयार करून सोमाटणे फाटा येथे सापळा लावला.

_MPC_DIR_MPU_II

काही वेळानंतर एक तरुण रिक्षामधून उतरला आणि सोमाटणे फाटा येथे रस्त्याच्या बाजूला थांबला. त्याच्या हातात एक पांढ-या रंगाची पिशवी होती. पोलिसांचा सुगावा लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तरुणाला शिताफीने ताब्यात घेऊन चौकशी केली.

आरोपी सचिन याची झडती घेतली असता त्याच्याकडे तीन देशी बनावटीचे गावठी पिस्टल आणि सहा जिवंत काडतुसे, असा एकूण एक लाख 59 हजार रुपयांचा ऐवज सापडला. सर्व शस्त्रसाठा जप्त करून पोलिसांनी आरोपी सचिन याला अटक केली आहे.

सचिन याच्याकडे पिस्तुलाबाबत चौकशी केली असता त्याने सुरुवातीला  उडवाउडवीची उत्तरे दिली.  पोलिसी  खाक्या दाखवताच त्याने त्याच्याकडे कोणत्याही प्रकरणाचा शस्त्र बाळगण्याचा परवाना नाही. तसेच  पिस्टल आणि काडतुसे मध्यप्रदेश येथील एका व्यक्तीकडून विक्री करण्यासाठी आणल्याचे सांगितले.

आरोपी सचिन याच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3(25) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गुन्हे शाखा युनिट पाचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुकत सुधीर हिरेमठ, विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहा पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे, धनराज किरनाळे, मयुर वाडकर, ज्ञानेश्वर गाडेकर, धनंजय भोसले, शामसुंदर गुट्टे, संदिप ठाकरे, गणेश मालुसरे, सावन राठोड, फारुक मुल्ला, दयानंद खेडकर, स्वामीनाथ जाधव, भरत माने, नितीन बहिरट, राजकुमार इघारे, गोपाळ ब्रम्हांदे, राजेंद्र शेटे, राजेंद्र कदम, नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.