Dehuroad : कोविड सेंटरसाठी वेळीच औषधे खरेदी करा : रघुवीर शेलार

Buy medicines on time for Kovid Center: Raghuveer Shelar

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील कोरोना विषाणूंचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी शाळेतील कोविड सेंटर व आयसोलेशन वॉर्डातील रुग्णांसाठी लागणारी औषधे आणि वैद्यकीय साहित्य   वेळीच खरेदी करावे ,  अशा सूचना बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी कॅन्टोन्मेंट प्रशासनाला दिल्या.

यासंदर्भात बोर्ड उपाध्यक्ष शेलार यांनी कॅन्टोन्मेंट सदस्य आणि बोर्ड अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.

बोर्ड कार्यालयातील उपाध्यक्षांच्या दालनात झालेल्या या बैठकीस आरोग्य समिती अध्यक्ष राहुल बालघरे, कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्य विशाल खंडेलवाल, हाजीमलंग मारीमुत्तू, तसेच बोर्डाचे कार्यालयीन अधीक्षक राजन सावंत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी, डॉ. श्रीधर जाधव आदी उपस्थित होते.

या बैठकीत प्रामुख्याने कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व त्या संदर्भात करावयाच्या उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडणारा परिसर तातडीने निर्जंतुक करावा. त्यासाठी आवश्यक जादा कर्मचारी व पंप उपलब्ध करून काम वेळेवर पूर्ण करावे.

तसेच शहरातील स्वच्छते संदर्भातील अन्य कामेही पूर्ण करावीत, अशा सूचना स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

ऑनलाइन शिक्षण पद्धती किंवा घरोघर जावून विद्यार्थ्यांना आठवड्याचा अभ्यास देणे. तो पूर्ण करून घेणे व त्याचा आढावा देणे यासंदर्भ शिक्षण विभागाचे प्रमुख यांना सूचनाही देण्यात आल्या.

तर सध्या कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे रुग्णालय आणि कोविड सेंटरसाठी आवश्यक असलेल्या डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय व अन्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने यामध्ये तातडीने वाढ करण्याची गरज असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जोशी यांनी बैठकीत सांगितले.

दरम्यान, याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर संजय खन्ना आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे कि, कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत दीडशेपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. येत्या पंधरा दिवसात ही संख्या तीनशे ते चारशे आणि महिनाभरात पाचशे ते एक हजारापर्यंत वाढू शकते.

त्यामुळे आयसोलेशन विभाग, कोविड केअर सेंटर व रुग्णालयांमध्ये वाढ करावी लागणार आहे. तसेच कोरोना रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेऊन त्यांची तपासणी करणे, त्यांना आयसोलेशन विभाग, कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणे. त्यांच्यावर उपचार करणे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

सध्या कॅन्टोन्मेंट बोर्डाकडील आयसोलेशन विभाग, कोविड केअर सेंटर, रुग्णालयीन स्टाफ आणि घरोघरी सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संख्या कमी आहे. त्यामध्ये लवकरात लवकर वाढ करावी लागेल; अन्यथा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाण्याची भीती या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

महात्मा गांधी शाळेतील कोविड सेंटर, आयसोलेशन सेंटर आणि रुग्णालयातील वैद्यकीय साहित्य आणि औषधांची वेळीच खरेदी करावी; अन्यथा ऐनवेळी साहित्य आणि औषधे खरेदी करावी लागल्यास ती महाग मिळण्याची शक्यता असल्याकडे लक्ष वेधत याबाबत आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी सूचनाही निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

निवेदनावर बोर्ड सदस्य विशाल खंडेलवाल, राहुल बालघरे, हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

दरम्यान, यासंदर्भात देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर संजय खन्ना व मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवालसर यांच्याशी फोनवर चर्चा करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.