Dehurod : देहूरोड पोलिसांनी अडीच टन गोमांस पकडले; दहा जिवंत जनावरांची कत्तल होण्यापासून सुटका

एमपीसी न्यूज – गोरक्षकांच्या मदतीने देहूरोड पोलिसांनी अडीच टन गोमांस पकडले आहे. तसेच कत्तल करण्यासाठी आणलेल्या दहा जनावरांची पोलिसांनी सुटका केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 29) पहाटे शीतळानगर येथे करण्यात आली.

सचिन साहेबराव शित्रे (वय 32, हाडपसर, पुणे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सर्फराज कादर तांबोळी (रा. मामुर्डी, देहूरोड) आणि त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 29) पहाटे तीनच्या सुमारास फिर्यादी सचिन यांना माहिती मिळाली की, शितळानगर येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये जनावरांची कत्तल सुरु आहे. त्यानुसार सचिन आणि त्यांचे चार मित्र देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलिसांच्या मदतीने त्यांनी शीतळानगर येथील वाशिंग सेन्टरच्या मागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश केला. पोलिसांची चाहूल लागताच तिघेजण पळून गेले तर एकाला पोलिसांनी पकडले. आरोपी तांबोळी यांच्याकडे तपास करत त्याच्याकडून अडीच टन गोमांस जप्त केले.

याव्यतिरिक्त कत्तल करण्यासाठी आरोपींनी दहा जनावरे आणल्याचे देखील निदर्शनास आले आहे. त्यामध्ये पाच बैल, चार गाई आणि एक कालवड यांचा समावेश आहे. याबाबत आरोपींवर महाराष्ट्र प्राणि संरक्षण सुधारणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.