IPL News : बातमी आयपीएलची-दिल्लीने पाडला पंजाब किंग्जचा फडशा, सात गडी राखून मिळवला विजय

अंकतालिकेत प्रथम स्थान

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) अहमदाबादच्या नरेंद मोदी मैदानावर झालेल्या आजच्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकण्यापासून ते सामना जिंकून प्रत्येक गोष्टीत बाजी मारत आज जबरदस्त कामगिरी केली.

के एल राहुलच्या अनुपस्थितीत नेतृत्व करणाऱ्या मयंक अगरवालने कर्णधारपदाचे कसलेही ओझे न बाळगता उत्तम फलंदाजी केली पण त्याला दुसऱ्या बाजुने हवी तशी साथ मिळाली नाही.

प्रभसिमरन,गेलं,शाहरुख खान अशी मोठमोठे नाव असलेले खेळाडू आज काहीही विशेष कामगिरी करू शकली नाही. ना आपल्या कर्णधाराला किमान साथ देऊ शकली, तरीही एकांड्या शिलेदारासारखा एकट्या मयंकने किल्ला लढवला आणि नाबाद 99 धावा करताना संघाला बऱ्यापैकी आव्हान उभे करु शकेल अशी धावसंख्या सुध्दा गाठून दिली.

केवळ दुर्दैवाने तो आपले शतक पूर्ण करू शकला नाही. पण त्याच्या या धावांमुळेच पंजाब किंग्ज आपल्या निर्धारित 20 षटकात 166 धावा करू शकला. दिल्ली कॅपिटल्स कडून रबाडाने तीन बळी घेतले ज्यात त्याने वेगावर गेलच्या चिपळ्या उडवल्या, हा चेंडू गेलंला कायमस्वरूपी आठवत राहील.

167 धावांचे लक्ष डोळ्यासमोर ठेवून शिखर धवन आणि पृथ्वी शॉने पुन्हा एकदा चांगली सलामी देत पहिल्या विकेटसाठी सहा षटकातच 61 धावा जोडताना आक्रमक फलंदाजी केली. बाद होण्या आधी पृथ्वीने 22 चेंडूत 3 चौकार आणि तेव्हढेच षटकार मारत 39 धावा केल्या, पण जम बसल्यानंतरही त्याचे आपली विकेट फेकणे त्याला आणि संघाला सुद्धा सतावत राहील. यानंतर स्टिव्ह स्मिथने धवन सोबत 48 धावा जोडल्यानंतर स्मिथ ही बाद झाला.

मात्र दुसऱ्या बाजूने शिखर धवन आपला अंतरराष्ट्रीय अनुभव पणाला लावून आक्रमण आणि संयम यांची सुरेख सांगड घालून आपले आणखी एक अर्धशतक करून खेळत होताच, त्याची रिषभ पंतने सुद्धा विजयाच्या वाटेजवळ साथ सोडली पण या कशाचाही आपल्या फलंदाजीवर गब्बरने परिणाम होऊ दिला नाही. यानंतर मात्र हेटमायरने केवळ चार चेंडूतच दोन षटकार आणि एक चौकार मारत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

शिखर धवन 69 धावा करून नाबाद राहिला. संघ जरी पराभूत झाला असला तरी आपल्या नाबाद खेळीने सर्वाना मोहीत करणारा मयंक अगरवाल सामनावीर ठरला.या विजयाने दिल्ली कॅपिटल्सने अंकतालिकेत प्रथम स्थान मिळवले आहे, तर पंजाब किंग्जला या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आता लागोपाठ विजय मिळवावे लागतील, ते होईल का नाही हे येत्या काही दिवसात समजेलच.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.