DC vs PBKS : चुरशीच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जला 17 धावांनी नमवत मिळवला रोमहर्षक विजय

ठाकूर ठरला विजयाचा शिल्पकार आणि म्हणूनच सामन्याचा मानकरीही

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) : करो वा मरो अशी प्ले ऑफसाठी परिस्थिती निर्माण झालेली असताना दिल्ली कॅपिटल्सने आज नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना केवळ 159 धावाच केल्या असल्या तरी त्या धावांचे सुरक्षित रक्षण करताना पंजाब सुपर किंग्ज ला 142 धावात रोखून 17 धावांनी विजय मिळवून  आपल्या प्ले ऑफची संधी आणखीनच मजबूत करत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला पाचव्या स्थानावर ढकलून देत चौथ्या क्रमांकावर विराजमान होत एक दमदार पाऊल टाकले आहे.

 टाटा आयपीएल आता अंतीम टप्प्याकडे येत आहे,गुजरात संघाने त्यात जवळजवळ आपले स्थान पक्के केलेच आहे,लखनऊ,राजस्थान संघही फार मागे नाहीत, पण बाकी एका स्थानासाठी मात्र पंजाब, दिल्ली, आरसीबी , केकेआर हे संघ अजूनही तळ्यात मळ्यात आहेत, त्यातल्याच दोन संघात म्हणजेच पंजाब सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघात टाटा आयपीएल 2022 चा आजचा 64 वा सामना मुंबईच्या डी वाय पाटील मैदानावर खेळवला गेला ज्यात पंजाब संघाचा कर्णधार मयंक आगरवालने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दिल्ली कॅपिटल्सला 159 धावात रोखून तो निर्णय बऱ्यापैकी योग्यही ठरवला.

दिल्ली संघाची सुरुवात आज अतिशय खराब झाली,या हंगामात चांगल्या फॉर्मात असलेला डेविड वॉर्नर सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर लिविंगस्टोनच्या चेंडूवर बाद झाला अन दिल्ली संघाला मोठाच धक्का बसला,मात्र यातून संघाला सावरत सर्फराज खान आणि मिशेल मार्शने अर्धशतकी आणि ती ही वेगवान भागीदारी करत आलेले दडपण बऱ्यापैकी कमी केले. याजोडीने फक्त 29 चेंडूत 51 धावा ठोकल्या,खतरनाक मूड मध्ये खेळत असलेल्या सर्फराजला वैयक्तिक 32 धावांवर अर्शदीप सिंगने बाद करत ही जोडी फोडली.

सर्फराजने फक्त 16 चेंडूत 200 च्या स्ट्राईकरेटने 32 धावा चोपताना 5 चौकार आणि एक षटकार मारला. तो बाद झाल्यानंतर आलेल्या ललित यादवनेही मार्शला चांगली साथ दिली आणि तिसऱ्या गड्यासाठी 47 धावांची आणखी एक छोटी पण उपयुक्त भागीदारी करत दिल्ली संघाच्या डावाला आणखीन बर्यापैकी स्थैर्य दिले.मात्र जम बसलाय असे वाटत असतानाच ललित यादव वैयक्तिक 24 धावा काढून अर्शदीपची दुसरी शिकार ठरला.तो बाद झाला आणि पाठोपाठ कर्णधार पंत आणि खतरनाक पॉवेल फारसे योगदान न देता बाद झाले आणि दिल्ली संघ दोन बाद 98 अशा चांगल्या स्थितीतून 5 बाद 112 अशा कठीण अवस्थेत आला.

या परिस्थितीतही मिशेल मार्शने जबरदस्त खेळ करत आपल्या चांगल्या फॉर्मचा अचूक फायदा उठवत आपले आणखी एक अर्धशतक पूर्ण करत संघाला 150 चा टप्पा गाठून देण्यात मोठा वाटा उचलला, मार्श 19 व्या षटकात जरी बाद झाला असला तरी त्याने 48 चेंडूत 4 चौकार आणि तीन षटकार मारत बहुमूल्य 63 धावा केल्या. त्याला अक्षय पटेलने नाबाद 17 धावा काढून चांगली साथ दिली ज्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने 7 गडी गमावून 159 धावांची लढण्यायोग्य धावसंख्या गाठली, पंजाबसाठी अर्शदीप आणि लिविंगस्टोनने प्रत्येकी तीन गडी बाद करत उत्तम गोलंदाजी केली.

या स्पर्धेतले आपले आव्हान प्ले ऑफ साठी जिवंत ठेवण्यासाठी पंजाब संघाला 120 चेंडूत 160 धावा हव्या होत्या, टी-20 च्या फॉरमॅट मध्ये हे आव्हान फारसे कठीण वाटत नाही, पण पंजाब संघाने आत्मघातकी फलंदाजी करत चेंडू दर चेंडू हे सोपे वाटणारे आव्हान हकनाक कठीण करुन टाकले.खरेतर शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टोने  चांगली सुरुवात करुन दिली होती,या जोडीने 23 चेंडूत 38 धावांची खणखणीत सलामी देत हे आव्हान स्वीकारले आहे याचाच जणू संकेत दिला होता. मात्र 15 चेंडूत 28 वेगवान  धावा काढुन बेअरस्टो नोर्जेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला, अन पंजाब संघाला पहिला धक्का बसला.

यातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाचा 29 धावात 5 खेळाडु बाद झाले आणि पंजाब संघाची अवस्था 6 बाद 67 अशी झाली. आणि दिल्ली संघाला मोठा विजय मिळणार अशी शक्यता निर्माण झाली. ठाकूरने 6 व्या षटकात धवन आणि राजपक्षेला बाद करुन सनसनाटी निर्माण केली होती. मात्र या स्पर्धेत प्रत्येक वेळी चांगली कामगिरी करणाऱ्या जितेश शर्माने झुंजार खेळ करत पराभवातले अंतर बऱ्यापैकी कमी केले.

जितेशने आजही चांगली फलंदाजी करताना 34 चेंडूत 3  चौकार आणि दोन षटकार मारत 44 धावा केल्या. त्याला राहूल चाहरनेही नाबाद 25 धावा करताना चांगली साथ दिली. पण हे दोघेही आपल्या संघाला विजयी करु शकले नाहीत. शार्दुल ठाकूरने जबरदस्त गोलंदाजी करत 4 बळी मिळवले आणि पंजाब संघाला विजयापासून 17 धावा दूर ठेवत आपल्या संघाला महत्वपुर्ण विजय मिळवून दिला. ज्यामुळे दिल्ली कॅपिटल्स आज तरी बंगलोर संघाला 5 व्या क्रमांकावर ढकलून देत चौथ्या क्रमांकावर विराजमान झाले आहे, आणि साहजिकच यामुळे पंत आणि कंपनीच्या प्ले ऑफ मध्ये जाण्याची आशा शाबूत राहिली आहे.

ठाकूरला अक्षर पटेल आणि कुलदीप यादवने दोन दोन गडी बाद करत उत्तम साथ दिली. ज्यामुळे पंजाब संघाला 9 गडी गमावून फक्त 142 धावाच करता आल्या. ज्यामुळे त्यांना 17 धावांची मात खावी लागली आणि आपले आव्हान ही खडतर झाल्याचे शल्यही सहन करावे लागणार आहे.

संक्षिप्त धावफलक

दिल्ली कॅपिटल्स

7 बाद 159

मार्श 63,सर्फराज 32,ललित यादव 24,अक्षर पटेल नाबाद 17

लिविंगसती 27/3,अर्षदीप सिंग 37/3,रबाडा 24/1

विजयी विरुद्ध

पंजाब सुपर किंग्ज

9 बाद 142

बेअरस्टो 28,धवन 19,जितेश शर्मा 44,राहूल चाहर नाबाद 25

ठाकूर 36/4,पटेल 14/2,कुलदीप यादव 14/2

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.