Delhi Corona News : तज्ज्ञ सांगत आहेत, …तर तपासणी करून घ्या !

एमपीसी न्यूज – सध्या हिवाळा सुरू आहे. थंडी वाढत आहे. डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. त्यात कोरोनाने अजूनही आपल्यातून मुक्काम हलवलेला नाही. थंडीच्या दिवसात फ्ल्यू होण्याची शक्यता असते. फ्ल्यू आणि कोरोना यातील बरीच लक्षणे सारखी असल्याने घसा खवखवणे, सर्दी होणे अशी लक्षणे दिसताच चाचणी करून घ्या, असा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे.

जगभरातील कोरोना बधितांची संख्या सहा कोटींच्या पुढे गेली आहे. तर मृतांच्या आकड्याने 14 लाख 32 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना बधितांची संख्या कमी होत असताना काही अवधीनंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात काही प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसत आहे.

त्यात आता हिवाळा सुरू आहे. हिवाळ्यात फ्ल्यू सदृश आजार होणं साहजिक आहे. फ्ल्यू आणि कोरोना यांची लक्षणे बहुतांश सारखीच आहेत. त्यामुळे फ्ल्यू सदृश लक्षणे आढळल्यानंतर तात्काळ चाचणी करून घेण्याचा सल्ला दिल्ली येथील जी. बी. पंत रुग्णालयातील डॉ. संजय पांडेय यांनी दिला आहे.

कोणत्याही प्रकारची लक्षणे नसताना देखील कोरोनाची बाधा होऊ शकते. त्यामुळे फ्ल्यू सदृश लक्षणे आढळल्यास घाबरून जाण्याचेही कारण नाही. मात्र काळजी घेणं गरजेचं आहे. इतर विषाणू कधी येतात, कधी जातात, त्यांचे फायदे-तोटे याबाबत वैद्यकीय विभागाकडे माहिती आहे.

मात्र, कोरोनाबाबत अजूनही अशी माहिती उपलब्ध झालेली नाही. कोरोनाच्या प्रसाराबाबत जगभरातील शास्त्रज्ञ माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

चाचण्यांबाबत बोलताना डॉ. संजय पांडेय म्हणाले, “रॅपिड अँटिजेन चाचण्यांचे अहवाल तात्काळ येतात. तर आरटी पीसीआर चाचण्यांचे अहवाल येण्यासाठी काही कालावधी लागतो. त्यामुळे प्रथम रॅपिड अँटिजेन चाचणी करावी. आवश्यकतेनुसार पुढील चाचणी करावी. कोरोनापासून वाचण्यासाठी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा. लस आल्यानंतर ती सगळ्यांना टप्प्याटप्प्याने सर्वांना दिली जाणार आहे. त्यासाठी शासनाने काही योजना देखील तयार केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.