Delhi news: कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ उठवा; खासदार बारणे यांची केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांकडे मागणी

खासदार बारणे यांनी संसद भवनात वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने अचानक घेतलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील कांद्याचे पीक घेणाऱ्या शेतकरी, बाजार समितीमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. कांदा उत्पादक शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यामुळे कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ उठवावी, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

खासदार बारणे यांनी संसद भवनात वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, भारताने एप्रिल, जूनमध्ये 19.8 कोटी डॉलर कांद्याची निर्यात केली आहे. गेल्यावर्षी 44 कोटी डॉलर कांद्याची निर्यात केली होती.

जगात भारतात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन घेतले जाते. त्यात महाराष्ट्र सर्वाधिक कांद्याचे पीक घेणारे राज्य आहे. भारतातून श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया, आखाती देशात निर्यात होतो.

कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

कांदा उत्पादक शेतकरी आंदोलन करत आहेत. अनेक शेतकरी कांदा या पिकांवरच अवलंबून आहेत. कांदा उत्पादक आणि त्याची विक्री यावरच त्यांचे जीवन अवलंबून आहे.

या अचानक घेतलेल्या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजार, निर्यात देशामध्ये भारताच्या प्रतिष्टेल धक्का बसला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तान, चीन अशा देशांना लाभ होऊ शकतो.

अचानक घेतलेल्या निर्णयामुळे देशात भयानक स्थिती निर्माण होऊ शकते. त्यासाठी तत्काळ कांद्यावरील निर्यातबंदी मागे घ्यावी अशी मागणी खासदार बारणे यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.