Delhi News: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी (वय 65) यांचे आज (बुधवारी) कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते.

बेळगाव लोकसभा मतदार संघातून ते सलग चार वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित कन्या असा परिवार आहे.

सुरेश अंगडी यांची कोरोना टेस्ट 11 सप्टेंबर रोजी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एम्स रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

सुरेश अंगडी हे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री होते. ते 2014 पासून कर्नाटकमधील बेळगाव येथून खासदार म्हणून निवडून येत होते. 2019 मध्ये त्यांच्याकडे मोदी मंत्रिमंडळात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. ते संसदीय समितीचे अध्यक्षही होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नरेंद्रसिंह तोमर, खासदार श्रीरंग बारणे यांनी अंगडी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.