Pune News : बदली कायदा भंग व भ्रष्टाचार प्रकरण ; वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणी 

Demand for action against Forest Minister Sanjay Rathore for transfer law violation and corruption cases.

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र कोरोनासारख्या गंभीर संकटाशी लढत असताना बदल्यांचा बाजार मांडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करून भ्रष्टाचार केला आहे. वारंवार बदल्यांच्या तारखा बदलून बदलीच्या कायद्याचा भंग केला आहे. वन विभागातील अनेक बदल्या आर्थिक व्यवहार करून झाल्या आहेत. त्यामुळे वनमंत्री संजय राठोड यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी भारत अगेन्स्ट करप्शनचे हेमंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

याबाबत हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून राठोडांवर कारवाईची मागणी केली आहे. बदल्यांना परवानगी देण्यासाठी राज्य सरकारने सतत धोरण बदलले. त्यामुळे राज्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.

15 टक्के बदल्यांना परवानगी देतांना 31 मेपर्यत बदल्या करण्याचा उल्लेख असताना 31 जुलै व 10 ऑगस्ट अशी दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली.

31 मेपर्यंत ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची तीन वर्षांची मुदत संपत नव्हती; त्यांनाही हटविण्यात आले आहे व मोक्याच्या ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांना आणण्यात आले. यामध्ये बदलीच्या कायद्याचा भंग झाला आहे, असे हेमंत पाटील यांनी सांगितले.

बदलीच्या नियमानुसार तीन आयएएस अधिकाऱ्यांची आस्थापना समिती बदली प्रस्ताव तयार करते व त्यामध्ये बदल करायचा असेल तर संबंधित मंत्र्यांने कारणाची लेखी नोंद करायची असते. त्यानंतर मुख्यमंत्री यांनी सही करायची असते.

तीन वर्ष पूर्ण झाली नाही, अशांची बदली करायची असेल तरीही मंत्र्यांनी कारण लेखी नोंदवायचे व अंतिम स्वाक्षरी मुख्यमंत्री यांनी करायची असा नियम आहे. पंरतु मंत्री संजय राठोड यांनी राज्यातील काही डीएफओ व 119 आरएफओचया बदल्या व नागपूर, यवतमाळ, नांदेड येथील वनपाल, वनरक्षक आदी आणि मुख्य वनरक्षक अशा अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्या बदलीत अनेक कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे.

याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी करतो, असेही हेमंत पाटील यांनी नमूद केले. याबाबत काही कारवाई झाली नाही, तर उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.