Chinchwad News: सोशल मीडियावर अनैतिक व्यवसायांच्या जाहिराती करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज – सोशल मीडियावर वेश्या व्यवसायासारख्या अनैतिक व्यवसायांच्या जाहिराती राजरोसपणे सुरू असून त्यामुळे समाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांनी स्वतः पुढाकार घालून अशा जाहिरातींवर बंदी घालावी तसेच जाहिरात करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना त्यांनी यासंदर्भातील निवेदन दिले आहे. फेसबुक तसेच अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सध्या ऑनलाईन मेल प्रॉस्टिट्यूट, ऑनलाईन फिमेल प्रॉस्टिट्यूट, डेटिंग साईट्स, होम सप्लाय, बॉडी मसाज अशा प्रकारच्या जाहिराती राजरोजपणे झळकताना दिसत आहेत.

 

या जाहिरातींच्या माध्यमातून लोकांना जाळ्यात अडकवून त्यांची फसवणूक करण्याचे, ब्लॅकमेल करण्याचे तसेच चारित्र्यहनन करण्याचे प्रकार संबंधित व्यावसायिकांकडून केला आहे. अशा फसव्या जाहिरातींना बळी पडलेल्या काही जणांवर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे.  हा प्रकार अत्यंत गंभीर असून त्याला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे, असे नाईक यांनी निवेदनात म्हटले आहे.

 

भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने घातक असलेल्या अशा अनैतिक व्यवसाय व जाहिरातींवर तातडीने बंदी घालून संबंधित व्यावसायिकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.