Pimpri: पिंपरी कॅम्पातील दुकानांसमोरील विक्रेत्यांवर कारवाईची मागणी

अतिक्रमणांचा प्रश्‍न चिघळण्याची शक्‍यता

एमपीसी न्यूज – पिंपरी कॅम्पातील व्यापा-यांनी स्थानिक लोकप्रतिनीधींसह पथारी आणि हातगाडीचालकांची अतिक्रमणे हटविण्याची मागणी केली. अन्यथा पिंपरी कॅम्प बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यावर टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी आयुकत श्रावण हर्डीकर यांची भेट घेत. या व्यापा-यांनी आपल्या दुकानांसमोर ठेवलेल्या आणि विक्रेत्यांच्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना कम्पातून चालणेदेखील मुश्‍किल झाल्याकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे पिंपरी कॅम्पातील व्यावसायिकांच्या अतिक्रमणाचा प्रश्‍न चिघळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

शहरातील पिंपरी कॅम्प ही महत्वाची बाजारपेठ आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि कापडासाठी ही बाजारपेठ प्रसद्धि आहे. पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच पुणे शहर,मावळ तालुका व परिसरातील अनेक नागरिक याठिकाणी विविध वस्तू खरेदीसाठी येत असतात. मात्र, या बाजारपेठेत पथारी व हातगाडीचालकांचे अतिक्रमण वाढत असुन, त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना व्यवसाय करणे अवघड होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी लोकप्रतीनिधीसह कॅम्पातील व्यापा-यांच्या शिष्टमंडळाने आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली आहे. या व्यावसायिकांवर तत्काळ कारवाई करा, अन्यथा पिंपरी कॅम्प बंद ठेवण्याचा इशारा या बैठकीत दिला आहे.

दरम्यान, टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी या कारवाईला विरोध केला आहे. या पथारी चालकांमुळे या व्यापा-यांना अथवा वाहतुकीला कोणताही अडथळा होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. याउलट कॅम्पातील व्यापा-यांनी दुकानांचे बांधकाम वाढविले असून, या दुकानांसमोरच चप्पल, बॅग आणि अन्य वस्तु विक्रेत्यांना जागा भाड्याने दिली आहे.

या विक्रेत्यांकडून दरमहा हजारो रुपये भाडे अनधिकृतपणे वसूल केले जात आहे. याशिवाय कॅम्पातील अरुंद रस्त्यावर स्थानिक व्यापा-यांच्या शेकडो दुचाकी उभ्या केल्या जात असल्याने, रस्ता आणखी अरुंद झाला आहे. त्यामुळे दुचाकी वाहने आणि या अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे पथारी चालकांवरील कारवाई चुकीची असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.