Pimpri : शहराची माहिती असणा-या स्थानिक अधिका-याची शहर अभियंतापदी नियुक्ती करण्याची मागणी  

एमपीसी न्यूज –  राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहर अभियंतापदी प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठवू नये. विकासकामांसाठी या पदावर शहराची व विकास आराखड्याची पूर्ण माहिती असणा-या अधिका-याची नियुक्‍ती होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे शहर अभियंता पदावर स्थानिक अधिका-याची नियुक्‍ती करण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.  

महापालिकेतील शहर अभियंता पद रिक्त असल्याने राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अधिकारी अ. मा. भालकर यांची पदोन्नतीने महापालिकेत शहर अभियंतापदी नियुक्ती केली आहे. प्रतिनियुक्तीवरील अधिका-याला हे पद देण्यास कर्मचारी महासंघाने देखील विरोध दर्शविला आहे. शहर अभियंता हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. या पदावर शहराची व विकास आराखड्याची पूर्ण माहिती असणा-या अधिका-याची नियुक्‍ती होणे आवश्‍यक आहे.

स्थानिक अधिका-यांच्या अनुभवाचा शहराच्या विकासासाठी उपयोग होऊ शकतो. प्रतिनियुक्तीवरील अधिका-याच्या नियुक्‍तीमुळे शहर विकासाला बाधा येण्याची दाट शक्‍यता आहे. नवीन अधिका-याला शहराच्या विकास आराखड्याचा अभ्यास करण्यासाठी अनेक महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे विकासाची सद्य परिस्थितीत असणारी गती कमी होऊन विकास थांबण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शहर अभियंता पदावर महापालिकेतील सक्षम आणि अनुभवी अधिका-याचीच नियुक्‍ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.