Entertainment News : दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका बंद करण्याची मागणी 

एमपीसी न्यूज  : महेश कोठारे निर्मित ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मालिकेच्या कथानकावर आक्षेप घेत मालिका बंद करण्याची मागणी गुरव समाजातील पुजाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी केली आहे.

दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेतील माहिती पट चुकीचा दाखवून भावना दुखवल्याबद्दल व खोटी माहिती प्रसारित करून फसवणूक केल्याबद्दल कोठारे प्रोडक्शनवर कारवाई करा असे निवेदन गुरव समाजाच्या वतीने सरपंच राधाताई बुणे यांना देण्यात आले आहे. उपसरपंच शिवाजीराव सांगळे यांनी या मालिकेची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. खोटा इतिहास खपवून घेतला जाणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

तर ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी मालिकेतील चुकीची माहिती दाखवली तर ती खपवून घेणार नाही तसेच पुढे असे झाल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा दिला आहे. सामाजिक कार्यकर्ते आनंदा लादे यांनी जोतिबा देवाचा इतिहास हा केदार विजय ग्रंथानुसार मालिकेत दाखवण्यात आला नसून यामुळे विटंबना झाल्याचा दावा केला आहे.

मालिका ही पौराणिक स्थरावर असावी. मात्र मालिकेतील भाषाशैली ही निंदनिय असल्याचे समितीचे अध्यक्ष नवनाथ लादे यांनी म्हटले आहे. तर मालिकेत भ्रमनिरास झाला असून मालिका विचार विनिमय करून सुरू करावी असे मत समितीचे सचिव संदिप दादर्णे यांनी व्यक्त केले आहे. महेश कोठारे यांनी दिशाभूल केल्याचा आरोप ग्रा पं.सदस्य लखन लादे यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.