Mpc News Vigil: शहरात ठिकठिकाणी पार्किंग स्पॉट बनवण्याची मागणी

एमपीसी न्यूज : शहरात पार्किंगची समस्या विक्राळ होत आहे. अपघात, वाहतूक कोंडी यांसह अनेक समस्या वाढत आहेत. वाहने पार्क करण्यासाठी अधिकृत जागा नसल्याने या समस्या उद्भवत आहेत. शहरात ठिकठिकाणी पार्किग स्पॉट बनवायला हवेत.

यामुळे रस्त्यावर अस्ताव्यस्त लावली जाणारी वाहने शिस्तीत एका ठिकाणी पार्क केली जातील. यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होईल. पादचारी नागरिकांना चालणे सोयीस्कर होईल. पार्किंगमुळे होणारे अपघात आणि अन्य गैरसोयी देखील कमी होतील.

महापालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा

महापालिकेकडून शहरात गर्दीच्या ठिकाणी पे अँड पार्क ही सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी. यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुढाकार घ्यायला हवा. नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांचा कर गोळा केला जातो. त्याबदल्यात नागरिकांना अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात, अशी मागणी पिंपरी-चिंचवडकर करीत आहेत.

बेशिस्त वाहन चालकांवर कठोर कारवाई व्हावी

बहुतांश ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या समोर रस्त्यावर वाहने पार्क केली जातात. पण वाहतूक पोलीस त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. रस्त्यावर, फूटपाथवर, बेशिस्तपणे वाहन पार्क केल्यास वाहतूक पोलिसांकडून त्यावर कठोर कारवाई केली जावी. वाहने जप्त करणे, आर्थिक दंड आकारणे, खटले नोंदवणे यांसारख्या कारवाई झाल्यास बेशिस्त वाहनचालक शिस्तीच्या रस्त्यावर येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.