Pimpri News : उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी  

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सन 2021-22  शिष्यवृत्तीकरिता महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी आहे. ती मुदत वाढवून 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत करावी अशी मागणी साद सोशल फाउंडेशनचे संघटक राहुल कोल्हटकर यांनी केली.

याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री  प्राजक्त तनपुरे, शिक्षण संचालक यांना पत्र पाठविले आहे. त्यात कोल्हटकर यांनी म्हटले आहे की, शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यासाठी सक्षम प्राधिकरण / संबंधित तहसीलदार यांच्या मान्यतेचे काही प्रमाणपत्रे दाखले आवश्यक असतात. हे प्रमाणपत्र मिळण्यात उशीर होत असल्याने अर्ज भरण्यासाठी सक्षम प्राधिकरण / संबंधित तहसीलदार यांना सादर केलेल्या अर्जाची पोहोच / पावती सादर करण्याची मान्यता देण्यात यावी. असे आदेश संबंधित महाविद्यालय यांना देण्यात याव्यात.

महाराष्ट्र राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी यांच्या करिता महाराष्ट्र राज्य उच्च संचलनालय यांच्या मार्फत राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना , डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना , एकलव्य आर्थिक सहाय्य , गुणवान विद्यार्थी आर्थिक सहाय्य योजना ( कनिष्ठ / वरिष्ठ स्तर ) , राज्य शासनाची दक्षिणा आधीछात्रवृत्ती , शासकीय संशोधन आधीछात्रवृत्ती , जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिष्यवृत्ती, राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती , गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थी यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती , शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती, माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य , अल्पसंख्याक विद्यार्थीसाठी शिष्यवृत्ती अशा राज्य शासनाच्या पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनाची राज्यात अंमलबजावनी करण्यात येते.

महाराष्ट्र राज्यातील सर्वच महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी आपल्या पात्रतेनुसार महाविद्यालय मधून महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सदर शिष्यवृत्ती करिता अर्ज करीत असतात.

शिक्षण संचालक  डॉ. धनराज तांबे यांच्या अहावनानुसार आर्थिक वर्ष सन 2021-22 अखेर असल्याने राज्यातील सर्व महाविद्यालय यांनी प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा याकरिता 31 जानेवारी पर्यंत अर्ज महाडीबीटी पोर्टल वरून ऑनलाईन करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी महाविद्यालयांनी  शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्यासाठी लागणारे कागदपत्रे विद्यार्थी यांना जमा करण्याचे सांगितले आहेत. त्यानुसार विद्यार्थी व पालक वर्गाच्या वतीने संबंधित कागदपत्रे उपलब्ध होण्यासाठी सक्षम प्राधिकरण / संबंधित तहसीलदार यांच्याकडे अर्ज सादर केले आहेत.

पण संबधीत कागदपत्रे हे महाराष्ट्र शासनाच्या महा ई सेवा , सेवा सेतू कार्यालय यामार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून मिळत असल्याने संबंधीत कागदपत्रे मिळण्यासाठी शासनाच्या वतीने काही कालावधी ठरवण्यात आला आहे जसे की , उत्पन्न दाखला – 8 ते 10 दिवस , रहिवासी दाखला , अधिवास प्रमाणपत्र – 15 दिवस अशा कालावधीत हे दाखले तयार होणार असल्याने सदर कागदपत्र 31 जानेवारी पर्यंत उपलब्ध होतील का ? याबाबत शंका निर्माण होत आहे. त्यामुळे सन 2021-22  च्या शिष्यवृत्ती योजनेकरिता अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 फेब्रुवारी 2022 करण्यात यावी, अशी मागणी कोल्हटकर यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.