Talegaon Dabhade : महात्मा फुले जनआरोग्य योजनेत रुग्णालयांकडून झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

जनसेवा विकास समितीची रुग्णालयांच्या कारभाराच्या चौकशीची मागणी

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात ज्या रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू आहे, अशा रुग्णालयांमध्ये अनागोंदी आणि भ्रष्टाचार होत आहे. अशा भ्रष्टाचारी कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी केली आहे.

किशोर आवारे यांनी त्यांच्या मागणीचे पत्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिले असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी नगरसेवक निखील भगत, रोहित लांघे, माजी नगरसेवक सुनील कारंडे, कल्पेश भगत, मिलिंद अच्युत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मावळ तालुक्यात राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत पाच रुग्णालये कार्यरत आहेत. त्यापैकी तळेगाव दाभाडे येथील अथर्व, मायमर, पायोनियर, संजीवनी आदी रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेतील लाभार्थीवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र या योजनेच्या माध्यमातून अथर्व रुग्णालयामध्ये सर्वाधिक मनमानी व भ्रष्ट कारभार होत असल्याचा आरोप आवारे यांनी यावेळी केला.

या रुग्णालयात लाभार्थींना या योजनेच्या आरोग्य सुविधांचा लाभ देण्यापेक्षा त्यांच्याकडूनच अनामत रकमेच्या नावाखाली पैसे उकळले जातात. तसेच या लाभार्थींकडून आम्हाला या महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ नको व पुढेही घेणार नाही, असे लिहून घेतले जाते. त्या लाभार्थ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जाते, असा आरोप आवारे यांनी यावेळी केला.

या योजनेत कोव्हीड आजाराची उपचार सुविधा असताना देखील अवघ्या दोन रुग्णांवरच उपचार केले असल्याची माहिती अधिकारात आवारे यांना उपलब्ध झाली आहे. तर अन्य रुग्णावर मोठ्या रकमा घेऊन उपचार केले असल्याचे आढळून आल्याचे आवारे यांनी सांगितले.

या रुग्णालयामध्ये असलेले आरोग्य रक्षक, वैद्यकीय अधिकारी, तसेच मेडिकल माफिया हे संगनमताने मनमानी करत असून त्यांच्याबाबत वरिष्ठ तालुका अधिकारी यांचेकडे तक्रार केली असता ते देखील त्या गोष्टीकडे कानाडोळा करतात. तसेच या योजनेत चाललेल्या भ्रष्टाचार व मनमानी कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी राज्याच्या आरोग्य मंत्री यांचेकडे केली असल्याचे आवारे यांनी सांगितले.

अथर्व हॉस्पिटलमध्ये जानेवारी 2021 ते आज तागायत 161 पात्र रुग्णांना तर डायलिसिसच्या दरमहा सुमारे 125 रुग्णावर  महात्मा फुले योजने अंतर्गत मोफत उपचार करण्यात आले आहेत. कोणाही रुग्णाला त्याचा इच्छेविरुद्ध वंचित ठेवले नाही. स्पेशल रूम, उच्चदर्जाचे स्टेंट व विरघळणारे  स्क्रू आदि जे या योजनेत समाविष्ट नाहीत, त्याची मागणी जेंव्हा रुग्ण, रुग्णाचे कुटुंबीय स्वेच्छेने प्राप्त करू इच्छितात तेंव्हा या योजनेचा लाभ त्यांना देता येत नाही. त्यामुळे कंसेंट लिहून घेणे नियमानुसार योग्य व बंधनकारक आहे.

– डाॅ अजित माने, डाॅ राजेंद्र देशमुख,

अथर्व हॉस्पिटल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.