Pimpri : विकासकामात रिंग, ठेकेदार, अधिकारी यांची चौकशी करण्याची मागणी

एमपीसी  न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयुर कलाटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची आज शनिवार (दि. 5) रोजी भेट घेतली व प्रभाग क्रमांक 26 मधील महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या विकासकामात ठेकेदारांकडून झालेल्या रिंगबाबत चौकशी करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या स्थापत्य विभागामार्फत प्रभाग क्रमांक 26 मधील विकासकामासाठी निविदा भरण्याचा आज (दि. 5) रोजी अंतिम दिनांक होता. या कामामध्ये ठेकेदारांनी रिंग करून प्रभागातील सर्व कामे वाटून घेतली आहेत.

यात काळेवाडी फाटा ते छत्रपती चाैकापर्यंतचा रस्ता सिमेंट कॅाक्रींटचा करणे (नऊ कोटी 59 लाख 37 हजार 769 ) ठेकेदार – सुनील अजवाणी, कावेरी चाैक सब-वे ते पिक सिटीपर्यंत सिमेंट रस्ता करणे ( 24 कोटी 48 लाख 43 हजार 847) ठेकेदार – एच. सी. कटारिया, वाकड-पिंपळे निलख मधील अंतर्गत रस्ते काॅक्रीटीकरण करणे (16 कोटी 64 लाख 90 हजार 190) ठेकेदार – कृष्णाई इन्फ्रा, कस्पटेवस्ती स्मशानभूमी येथे गॅबियन वाॅल बांधणे ( 2 कोटी 49 लाख) – ठेकेदार एस. एस. साठे. यांचा समावेश आहे.

चारही ठेकेदारांना दोन्ही आमदार व महापालिका अधिकाऱ्यांचा आशिर्वाद आहे. त्यामुळे संगनमताने या निविदा भरल्या जातात. चार कामांच्या निविदांमध्ये हे चारच ठेकेदार सहभागी होत असल्याने, प्रत्येक काम वाटून वाढीव दराने घेतले जाते. शहरातील करदात्या नागरिकांच्या पैशाची या दोन्ही आमदारांकडून उधळपट्टी केली जात आहे. शहरातील विविध विकासकामे काढण्याची शक्कलही हे ठेकेदारच देत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. दुसऱ्या प्रामाणिक ठेकेदारांची या प्रकारामुळे कुचंबना होत आहे. तेव्हा आयुक्तांनी या प्रकारात लक्ष घालून संबंधित ठेकेदार व अधिकारी यांची चौकशी करावी. दोषी ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा नगरसेवक मयूर कलाटे यांनी आयुक्तांना दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.