Pune : नदीजोड प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती गरज लक्षात घेता धरणातील पाणीही अपुरे पडू लागले आहे. भविष्यातील लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेता पाण्याची कमतरता तीव्रतेने भासणार आहे. त्यामुळे पुढील वीस वर्षांचा विचार करून नदीजोड प्रकल्पाचा धरणसाखळीतील पाण्यात वाढ करण्याच्या दृष्टीने कसा उपयोग करून घेता येईल यासाठी हा अहवाल तयार करण्याची मागणी प्रस्तावाद्वारे सदस्य सचिन दोडके यांनी केली आहे.
खडकवासला, पानशेत आणि वरसगाव या तीन धरणांना नदीजोड प्रकल्पाने जोडल्यास मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकते. सावित्री भीमा नदी व्हॅली लिंक किंवा मध्य कोकणातून भीमा खोरे नदीजोड प्रकल्प यातील कोणता प्रकल्प यासाठी उपयोगी पडेल. याचा अभ्यास बंगळुरू येथील “राष्ट्रीय जलविकास प्राधिकरण’ यांच्याकडून करून घ्यावा आणि तो झाल्यानंतर केंद्राकडून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आग्रह धरावा, असा प्रस्ताव दोडके यांनी दिला होता. त्याला मंजुरी देण्यात आली. वास्तविक या संबंधीचा अहवाल 2011 मध्ये बनवला होता. मात्र, त्याला आठ वर्षे झाली असून, आता जागेवरील परिस्थिती बदलल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे हा अहवाल नव्याने बनवण्याची मागणी करण्यात आली आहे.
हा प्रकल्प झाल्यास पुणे शहराला आणि जिल्ह्यालाही त्याचा लाभ होईल. सुमारे 25 ते 40 टीएमसी पाणी मिळू शकणार आहे. एवढेच नव्हे तर धरण 100 टक्के भरलेले ठेवता येईल. याशिवाय मुठा नदी 12 महिने दुथडी भरून वाहू शकेल. यामुळे प्रदूषण कमी होईलच त्याचबरोबर नदीसुधार योजना आणि जलवाहतुकीला चालना मिळणार आहे. याशिवाय धरणात जास्त पंपींग करावे लागणार नसल्याने विजेची बचतही होऊ शकेल.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like