Khadki News: स्टेशन ते पार्क रोडवरील धोकादायक झाड काढून टाकण्याची मागणी

छावा मराठा संघटनेचा आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज – खडकी स्टेशनकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे जाणाऱ्या पार्क रोडवर भले मोठे झाड उन्मळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, तरीही खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन किंवा महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. झाड उन्मळून पडून मोठी दुर्घटना होण्याआधी हे झाड बाजूला करण्याची मागणी छावा मराठा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की खडकी रेल्वे स्टेशनकडून औंधकडे जाणारा रस्ता हा नेहमीच गजबजलेला असतो. वाहनांची मोठी वर्दळ या रस्त्यावर असते. याच रस्त्यावरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे एक रस्ता जातो. पार्क रोड-जोशी गेट असे नाव असलेल्या या रस्त्यावर विद्यापीठानजीक एक भव्य इमारत असून, यामध्ये राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे फ्लॅट आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनांची सतत ये जा असते.

या भागात क्यूएमटीआय टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे. पीपी होम आहे, जिथे युद्धात अपंग सैनिक राहतात. ते व्हील चेअरवर फिरत असतात. तसेच या भागात कालीमाता मंदिर, आयप्पा मंदिरही याच परिसरात आहे. त्यामुळे या भागात वर्दळ खूप असते. माजी सैनिक, विद्यापीठात जाणारे प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी याच रस्त्याचा वापर करीत आहेत. या रस्त्याच्या सुरुवातीलाच हे भले मोठे झाड वाकलेल्या अवस्थेत आहे. या झाडानजिक चौक असून, चौकात छोटी दुकाने, रिक्षा, चारचाकी थांबलेल्या असतात. हे धोकादायक झाड उन्मळून पडल्यास रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अपघात घडेलच, शिवाय नागरिकांच्या जिवीतालाही धोका आहे.

त्यामुळे हे धोकादायक झाड शक्य तितक्या लवकर काढून टाकण्यात यावे. अन्यथा झाड उन्मळून पडून होणाऱ्या दुर्घटनेस खडकी कॅन्टोन्मेंट प्रशासन व महापालिका प्रशासन जबाबदार असेल. हे झाड न काढल्यास छावा मराठा संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही रामभाऊ जाधव यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.