Chakan : बेशिस्त वाहतुकीला चाप लावण्याची मागणी; आरटीओ व स्थानिक पोलिसांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज 

आरटीओचे अधिकारी चाकणला रात्री शोधतात केवळ सावज 

एमपीसी न्यूज – पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील मोशीपासून चिंबळी फाटा, आळंदी फाटा, तळेगाव चौक, आंबेठाण चौक येथील वाहतूक कोंडीचे दुष्टचक्र काही सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. वर्दळीच्या चौकांमध्ये प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली आहे. वाहतूक कोंडी आणि वाढते रस्ते अपघात टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने  बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.    

वाहतूक पोलिसांकडून बहुतांशी वाहनचालकांवर किरकोळ स्वरूपाची कारवाई केली जाते. आरटीओचे काही अधिकारी मूळ काम सोडून चाकण भागात केवळ रात्रीच्या वेळी सावज शोधत असल्याचे आक्षेप नागरिकांकडून घेतले जातात. मात्र, या दोन विभागांनी नफ्या-तोट्याचा विचार बाजूला ठेवून एकत्रितपणे खरेखुरे प्रयत्न केल्यास बेफाम बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावणे शक्य होणार आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने शेकडो वाहनधारकांसह निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. चाकण मध्ये नुकत्याच झालेल्या एका अपघातात पाच निष्पाप कामगारांना जीव गमवावा लागला आहे. वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी  वाहतूक पोलीस आणि आरटीओ अधिकारी यांनी संयुक्त प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.