Pimpri : शौचालय बांधणीच्या प्रस्तावाची बढतीची उपसूचना रद्द करण्याची मागणी 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सह शहर अभियंता राजन पाटील यांना शहर अभियंतापदी बढती देण्याची उपसूचना विसंगत आहे. सत्ताधा-यांनी स्वच्छ भारत अभियानातील शौचालय बांधण्याच्या अवलोकन प्रस्तावास शहर अभियंता बढतीची उपसूचना देत मंजुरी दिली. उपसूचना मूळ प्रस्तावाशी विसंगत असल्याने भाजपच्या दबावाला बळी न पडता ती रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी महापालिकेकडे केली आहे. 

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्या वाघेरे यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वच्छ भारत अभियानातील शौचालया बांधण्याच्या अवलोकन प्रस्तावास सह शहर अभियंता राजन पाटील यांना शहर अभियंता बढतीची उपसूचना देत मंजुरी दिली. विरोध डावलून महापौर, सभागृह नेत्याने दादागिरी करत विसंगत उपसूचना रेटून नेली आहे. ही उपसूचना मूळ प्रस्तावाशी विसंगत आहे.

सत्ताधारी भाजपच्या दादागिरीला बळी पडू नये. तातडीने बढतीची विसंगत उपसूचना रद्द करण्यात यावी. विसंगत उपसूचना मंजूर केल्यास न्यायालयात धाव घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच राज्य सरकारने शहर अभियंतापदी प्रतिनियुक्तीवर पाठविलेल्या अधिका-याला रुजू करुन घेण्याची मागणीही वाघेरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.