Pimpri : आरोग्य समस्या सोडविण्यासाठी सदस्यांची समिती गठीत करण्याची मागणी

एमपीसी न्यूज –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेञातील सरकारी रुग्णालयांवरती नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी येत्या २१ दिवसात ‘नियंत्रण समिती’ गठीत करावी, अशी मागणी शिवसेनेचे युवराज दाखले यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे  केली आहे. 

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की,  शहरातील महापालिका  रुग्णालयांची अत्यंत वाईट अवस्था झाली असून, याचा सर्वाधिक फटका शहरातील सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यास अडचण निर्माण होत आहे.

आयुक्तांनी या समस्येचे निराकरण करण्याकरिता शहरातील सामाजिक, वैद्यकीय व लोकप्रतिनिधींच्या १२ सदस्यांची समिती गठीत करावी.

रुग्णालय प्रशासन व रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये समन्वय निर्माण होईल अशा प्रकारचे कार्य या समितीचे राहील. यामुळे वैद्यकीय उपचारांच्या समस्या कायमस्वरूपी सुटतील व रूग्णांची हेळसांड होणार नाही.त्यामुळे आयुक्तांनी आरोग्यसमस्या सोडवण्याकरिता वेळीच पाऊल उचलून वंचितांना न्याय दिला नाही तर शिवसेना रहाटणी-काळेवाडी विभाग व शिवशाही व्यापारीसंघाच्या वतीने शहरातील अन्यायग्रस्त रुग्ण व त्यांचे नातेवाईकांसोबत महापालिकेवर मोर्चा आणून शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल,  असे दाखले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.