Pune Gramin News : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल रात्री बारा पर्यंत सुरु ठेवण्याची मागणी

पुणे ग्रामीण हॉटेल असोसिएशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज : नाताळ, 31 डिसेंबर आणि नववर्षारंभ या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहे. त्यामुळे हॉटेल देखील रात्री अकरा वाजता बंद करावी लागत आहेत. हॉटेल लवकर बंद होत असल्याने ग्राहकांनी हॉटेलकडे पाठ फिरवली असल्याने नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल रात्री बारा पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे ग्रामीण हॉटेल असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

असोसिएशन कडून मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाताळ, 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाची सुरुवात या कालावधीत कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून शासनाने रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे रात्री अकरा वाजता सर्व दुकाने आणि हॉटेल बंद होत आहेत. हॉटेल रात्री अकरा वाजता बंद होत असल्याने नागरिकांनी हॉटेलकडे पाठ फिरवली आहे. याचा हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.

हॉटेल रात्री 12 पर्यंत सुरु ठेवण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी. हॉटेल व्यावसायिकांकडून कोरोना साथीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सर्व खबरदारी घेतली जाईल. कोरोना काळात मोडकळीला आलेल्या हॉटेल व्यवसायाला शासनाने मदत करावी, असे म्हटले आहे.

असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब दाते म्हणाले, “हॉटेल व्यावसायिकांना आर्थिक पॅकेज मिळावे, यासाठी पुणे ग्रामीण हॉटेल असोसिएशनकडून मागणी आणि पाठपुरावा केला जात होता. त्याचा विचार करून शासनाने परमिट रूम धारक हॉटेलच्या अनुज्ञप्ती शुल्कात 50 टक्के सवलत जाहीर केली आहे. अनुज्ञप्ती शुल्कात केलेली 15 टक्के वाढ देखील शासनाने मागे घेतली आहे. याबद्दल पुणे ग्रामीण हॉटेल असोसिएशनकडून राज्य शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

वीज बिल आणि मिळकत करामध्ये देखील अशा प्रकारची सवलत द्यावी, अशी मागणी देखील असोसिएशनकडून करण्यात आली असल्याचे दाते यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.