Pimpri : पिंपरी पालिकेत लोकनेते गोपीनाथ मुंडेंचे तैलचित्र लावण्याची मागणी

एमपीसी न्यूज – देशाच्या राजकारणात, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना गोपीनाथ मुंडेंनी नेहमीच उल्लेखनीय कामगिरी बजावली. अत्युच्च पदावर पोहोचल्यानंतरही त्यांच्या स्वभावात कधीही बदल झाला नाही. एक स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हणून मुंडेंनी आपली तत्त्वे आयुष्यभर जोपासली आणि त्यांच्या या गुणांमुळेच ते कायम समाजाभिमुख राहिले आहेत. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्रासह देशाचे मोठे नुकसान झाले असून, त्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. त्यांच्या कार्याचा व त्यागाचा गौरव म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे तैलचित्र बसविण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. 

याबाबत आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शेतकरी, शेतमजूर, मागास व भटक्या जाती-जमाती आणि विपन्नावस्थेतील समाजघटकांसाठी मुंडेंचे कार्य होते.राजकारण,समाजकारण यांची उत्तम जाण आणि राजकारणाच्या पलीकडे संबंध जपण्याच्या वृत्तीमुळे सर्वच पक्षांमध्ये त्यांचे उत्तम संबंध होते. पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे तैलचित्र बसविण्यात यावे, असा ठराव १७ जून २०१४ मध्ये करण्यात आला होता.

तैलचित्र बसविण्याचा ठराव होऊन चार वर्षे उलटली आहेत.परंतू तरी देखील महापालिका प्रशासनाकडून आजतागायत मुंडे यांचे तैलचित्र न बसविले जाणे हि मोठी शोकांतिका आहे. मुंडे यांच्या नावाखाली अनेकांनी पालिका, प्राधिकरण, खासदारकी व इतर क्षेत्रात लाभाची पदे घेतली आहेत. पदे पदरात पडल्यानंतर मात्र मुंडे यांचे तैलचित्राबाबत कोणीही आग्रही भूमिका घेतलेली नाही. ही दुर्दैवाची बाब आहे.

त्या अनुषंगाने बहुआयामी व्यक्‍तीमत्‍वाचा, त्यांच्या कार्याचा व त्यागाचा गौरव म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे तैलचित्र बसविण्यात यावे, अशी मागणी खैरनार यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.