Pimpri:आरक्षित जागेवर अभ्यासिकेची पँथर्स रिपब्लिकन पार्टीची मागणी

एमपीसी न्यूज –  दापोडी येथील झोपडपट्टीतील मुला-मुलींची अभ्यासिकेअभावी होत असलेली गैरसोय दूर करण्याची मागणी पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष गौतम डोळस यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. 

 

डोळस यांनी विद्यार्थ्यांच्या सह्या असलेले निवेदन आयुक्तांना दिले असून, यामध्ये सांगवी आणि कासारवाडीतील अभ्यासिकेप्रमाणे आरक्षित जागेवर महापालिकेने विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका तयारी करावी, अशी मागणी केली आहे. या परिसरात कष्टकरी, मोलमजुरी करून उपजिवीका करणारी कुटुंबे मोठ्या प्रमाणात आहेत. ही कुटुंबे झोपडपट्टीत वास्तव्यास आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अपुर्‍या जागेत अभ्यास करणे शक्य होत नाही.

 

सुमारे 100 ते 150 विद्यार्थी दररोज येथील बुद्धविहारातील मोकळ्या जागेत अभ्यासाला बसतात. बुद्धविहारात दर्शनासाठी आणि कार्यक्रमासाठी सतत लोक येत असल्यामुळे शांतता नसते. परिणामी ऊन, वारा, पावसाचा विद्यार्थ्यांना सामना करावा लागतो. याशिवाय कोणत्याही बैठक व्यवस्थेविना विद्यार्थ्यांना खडतर परिस्थितीत अभ्यास करावा लागत आहे. तसेच स्पर्धा परीक्षेच्या तयारीकडेही विद्यार्थी आशावादी दृष्टीने पाहत आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरिता युवकांनी आपली ताकद पणाला लावली आहे. पण अभ्यासासाठी आवश्यक सुविधा नाहीत. त्यामुळे महापालिकेने आरक्षित जागेवर अभ्यासिका उभारावी, अशी मागणी गौतम डोळस यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.