Hinjwadi : हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची अपना वतन संघटनेची मागणी

एमपीसी न्यूज – हिंजवडी हे जागतिक स्तरावर सुप्रसिद्ध नाव असून राज्यातील सर्वात मोठा आयटी हब म्हणून ओळखले जाते. हिंजवडी परिसरात कंपन्यांमध्ये तीन लाखापेक्षा जास्त अभियंते काम करतात. दोन ते अडीच लाख वाहने ये – जा करतात. शिवाजी चौकातून, भूमकर चौकातून, माणकडून व अन्य मार्गाने येणारी अशी सहा लेनवरील वाहने एकाच ठिकाणी एकत्र येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणवर वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्धीकी शेख यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केले आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,  हिंजवडीमध्ये कामासाठी येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे सकाळी २ तास संध्याकाळी २ तास असे ४ तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते. त्यामुळे त्यांचा वेळ वाया जातो. वाहतुकीच्या अनास्थेमुळे या कंपन्यांना उत्तम बौद्धिक क्षमता असलेल्या कर्मचाऱ्यांनाही गमवावे लागत आहे. सकाळी व संध्याकाळी तास -तास गाडी चालू ठेवून थांबल्यामुळे इंधनाची मोठ्या प्रमाणवर नासाडी होते. हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे.  गाड्या पार्किंगसाठी ठिकठिकाणी वाहनतळ उभारणे.

हिंजवडी आयटी पार्कमध्ये दोन ठिकाणाहून प्रवेश करता येऊ शकतो. भूमकर चौक आणि वाकड चौक ही दोन ठिकाणे त्यादृष्टीने महत्त्वाची आहेत. सहा वेगवेगळे मार्ग याच ठिकाणी एकत्र येतात. या भागातच प्रामुख्याने वाहतूक कोंडी निर्माण होते. हिंजवडी आयटी पार्क सहा टप्प्यात उभारला जाणार असून दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यात कंपन्यांची उभारणी सुरु झाली आहे. उर्वरित टप्प्यांचे काम पूर्ण झाले तर तसेच मेट्रोचे काम सुरु झाले तर वाहतूक कोंडीची समस्या भीषण होणार आहे. त्यामुळे आतापासूनच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हिंजवडीमध्ये काम करणारे आयटीयन्स व अपना वतन संघटनेच्या वतीने हिंजवडीमधील वाहतूक समस्येबाबत आपणाकडे निवेदन देण्यात येत आहे. तरी आपण याबाबत बैठक घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.