Nigdi News : चोरलेला मोबाईल परत देण्यासाठी 10 हजारांची मागणी

पैसे न दिल्यास खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी

एमपीसी न्यूज – चोरलेला मोबाईल फोन मालकाला परत देण्यासाठी दहा हजारांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. याबाबत एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 23 ते 25 मार्च या कालावधीत निगडी परिसरात घडला.

संतोष रतन शिंदे (वय 39, रा. निगडी) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  मंगेश नथुराम रेणुसे (वय 24, रा. लाव्हे, गुंजावणे, ता. वेल्हा, जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंगेश याने फिर्यादी शिंदे यांचा मोबाईल फोन चोरला. तो परत देण्यासाठी दहा हजार रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादी यांनी पैसे न दिल्यास त्यांच्या मोबाईल मधील डाटा डिलीट करून खाजगी फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची आरोपीने धमकी दिली. तसेच पोलिसात तक्रार दिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली.

आरोपीने फिर्यादी यांच्याकडून 500 रुपये गुगल पेद्वारे स्वीकारले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.