Maval : प्रचाराची मुदत संपल्यानंतर बाहेरच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मतदारसंघात थांबू देऊ नका

शिवसेना-भाजपच्या शिष्टमंडळाची निवडणूक निर्णय अधिका-यांकडे मागणी

एमपीसी न्यूज- मावळ लोकसभा मतदारसंघासाठीच्या निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची आज (शनिवारी)सायंकाळी सहा वाजता सांगता होणार आहे. त्यामुळे नियमानुसार मतदारसंघाबाहेरील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मतदारसंघात थांबू देऊ नये, अशी मागणी शिवसेना-भाजपच्या शिष्टमंडळाची निवडणूक निर्णय अधिका-यांकडे केली आहे.

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांची भेट घेऊन ही मागणीकेली आहे. निरीक्षक अधिका-यांना देखील याबाबतचे पत्र दिले आहे. यावेळी खासदार अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे उपस्थित होते.

मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी (दि.29 ) मतदान होणार आहे. आचारसंहितेनुसार मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तास अगोदर प्रचार थांबवावा लागतो. प्रचार थांबल्यानंतर मतदारसंघाबाहेरील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मतदारसंघात थांबता येत नाही.

पुणे जिल्ह्यातील दोन पुणे व बारामती मतदारसंघातील तसेच राज्यातील तीन टप्प्यातील बहुतांश मतदारसंघात मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने बाहेरच्या मतदारसंघातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी/कार्यकर्ते व अज्ञात व्यक्तींचा वावर मावळ लोकसभा मतदारसंघात वाढलेला आहे. आमच्या कार्यकर्ता प्रचारापासून दुरावला जात असून दहशतीचे, भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदारसंघाबाहेरील व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे वातावरण मुक्त व निष्पक्ष राहण्यात अडचण येऊ शकते. यामुळे निवडणूक प्रशासन, पोलीस प्रशासनाने दक्ष राहून प्रचारासाठी आलेली बाहेरील व्यक्ती मतदारसंघात राहणार नाही, त्याची खात्री करून खबरदारी घेण्यात यावी.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1959 चे कलम 126 अन्वये मतदानाआधी 48 तासांपूर्वी जाहीर प्रचार बंद करण्याची तरतूद आहे. या कलमांतर्गत जाहीर प्रचार संपल्यानंतर मतदारसंघात कोणत्याही पक्षाचे स्टार प्रचारक, मतदार संघाच्या बाहेरील पक्षाचे कार्यकर्ते/व्यक्ती संबंधित मतदारसंघात राहू शकत नाही.

मावळ लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होत आहे. मतदारसंघाबाहेरील व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे वातावरण मुक्त व निष्पक्ष राहण्यात अडचण येऊ शकते. मतदारसंघाबाहेरील व्यक्ती राहू शकणारी संभाव्य ठिकाणे यात सार्वजनिक सभागृहे, खासगी हॉल, रेस्ट हाऊस, लॉजिंग, हॉटेल्स, मंगल कार्यालये यांचा समावेश आहे. या ठिकाणांची कसून तपासणी करण्यात यावी आणि त्यांच्यावर उचित कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.