Pimpri : वनौषधी उद्यानाची जबाबदारी जनसेवा दत्त आश्रमाकडेच कायम ठेवण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी एमआयडीसी येथील आयुर्वेद वनौषधी उद्यानाची जबाबदारी जनसेवा दत्त आश्रमाकडेच कायम ठेवण्याची मागणी हरित सेनेचे सागर चरण यांनी महापालिकेकडे केली आहे. 

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेचे भोसरी एमआयडीसीमध्ये आयुर्वेद वनौषधी उद्यान आहे. या उद्यानाची देखरेख, विकास व संरक्षण करण्यासाठी महापालिकेने जनसेवा दत्त आश्रमाकडे जबाबदारी दिली आहे. त्यासाठी महापालिकेमार्फत अंशत: अनुदान देण्यात येते. परंतु, संबंधित संस्थेला कोणतीही पूर्वकल्पना न देता पालिकामार्फत दुस-या कुठल्यातरी संस्थेला अनुदान तत्वावर या उद्यानाची जबाबदारी सोपविली आहे.

हे उद्यान जनसेवा दत्त आश्रमाचे वैद्य मारूती जाधव सांभाळत आहेत. सन 1997 पासून हे उद्यान विकसित करण्यात आले आहे. यामध्ये जाधव यांनी सुमारे साडेचारशेहून अधिक विविध प्रकारची वनौषधी, वृक्ष, झुडूप, वृक्षवर्गीय व वेलवर्गीय वनस्पती, अनेक प्रकारचे कंद, तसेच ठराविक ऋतुतच वाढणा-या अनेक वनौषधी वनस्पती, दुर्मिळ वनस्पतींची लागवड करून जपली आहे.

त्यामुळे इतकी वर्षे उद्यान सांभाळणा-या आणि सेवाभावी वृत्तीने काम करणा-या मारूती जाधव गुरूजी यांच्या जनसेवा दत्त आश्रम या संस्थेकडेच उद्यानाची जिम्मेदारी ठेवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.