एमपीसी न्यूज : अनेक गरजू, गरीब व बेघर असणाऱ्या कुटुंबांनी गायरान जमिनीत घरे बांधलेली आहेत. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे या कुटुंबांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे अतिक्रमणे कायम करावीत, अशी मागणी खेड तालुक्यातील विविध गावाच्या ग्रामस्थांनी केली आहे. (Chakan News) चाकण ( ता. खेड ) येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सुमारे पन्नास गावातील नागरिकांनी हजेरी लावली. यावेळी एकत्रित लढा देण्यासाठी कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे.
खेड तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात गायरान जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. 49 गावांमध्ये तब्बल 2892 अतिक्रमणे असून शेकडो नागरिकांना प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. चाकण मधील बैठकीला आलेल्या नागरिकांनी कैफियत मांडताना सांगितले कि, कित्येक वर्षांपासून पालाच्या खोपी बांधून राहणाऱ्या कुटुंबांनी घरे बांधली आहेत. अनेकांची घरी मागील 50 वर्षांपासून आहेत. उच्च न्यायालयाने ही अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे अनेक संसार उध्वस्त होणार आहेत. कुटुंबे बेघर होणार आहेत. गायरानातील राहती घरे काढली तर आमच्यासमोर कोणताच पर्याय उरणार नाही. तरी वस्तुस्थिती विचारात घेऊन बेघर, गरजू कुटुंबांची अतिक्रमणे कायम करावी, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.
खेड तालुक्यातील नागरिकांच्या लढ्यासाठी यावेळी कृती समितीची स्थापना करण्यात आली असून प्रशासन, शासन आणि न्यायालयीन लढा एकत्रितपणे देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला असल्याचे अॅड. निलेश आंधळे, मनोहर वाडेकर, बाळासाहेब चौधरी, काळूराम कड, अॅड. निलेश कड,(Chakan News) आनंद गायकवाड, बाळासाहेब पठारे, सचिन पानसरे यांनी सांगितले. गायरान जमिनीवरील अतिक्रमण न काढण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला असल्याचे सांगण्यात येत असले तरी यासाठी न्यायालयीन लढा देण्याची गरज असल्याचे अॅड. निलेश कड यांनी सांगितले.
नागरिकांमध्ये अस्वस्थता
न्यायालयाच्या आदेशानुसार गायरानावरील अतिक्रमण काढून टाकण्याबाबत प्रशासनाने कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून खेड तालुक्यातील शेकडो कुटुंबांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटीस बजावली आहे. या सर्वांचे संसार उघड्यावर येण्याच्या भीतीने नागरिक अस्वस्थ झाले आहेत.(Chakan News) गायरान जमिनीवर अनेक वर्षांपूर्वी हातावरील पोट असलेल्या निराधार व्यक्तींनी घरे बांधली आहेत. त्यातील अनेकांना राहायला स्वत:ची जागा देखील नाही. त्यामुळे अनेक नागरिकांमध्ये मोठी अस्वस्थता आहे.