Pimpri :  ‘ईव्हीएम हटाओ, आरटीआय बचाओ’साठी निदर्शने

एमपीसी न्यूज –  केंद्र सरकारने माहिती अधिकारात केलेले बदल मागे घ्यावेत तसेच ईव्हीएम मशीन हटवून आगामी विधानसभा निवडणुका मतपत्रिकेव्दारे व्हाव्यात, या मागण्यासाठी ईव्हीएम हटाओ, आरटीआय बचाओ जनआंदोलन समितीच्या वतीने पिंपरीत मोबाईल टॉर्च आणि निदर्शन आंदोलन करण्यात आले.

पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आज (गुरुवारी) आंदोलन झाले. यावेळी जनआंदोलन समितीचे मुख्य समन्वय मारुती भापकर, सचिन साठे, सचिन चिखले, भारतीय मायनॉरिटीज सुरक्षा महासंघाचे मारुती कदम, संतोष कदम, मानव कांबळे, विजया बेंगळे, पार्वती कांबळे, पूनम मानकर, रेश्मा डोगरा, संतोष कांबळे, अमीन शेख, आशा गायकवाड, सिद्धू सिंग, सुषमा सोनवणे, सतीश कदम, अरुण थोपटे, अरुण बकाल, हरिश्चंद्र तोडकर, प्रताप गुरव, विशाल जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांनी ‘ईव्हीएम हटाओ, देश बचाओ’ अशी जोरदार घोषणाबाजी केली. लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम यंत्राच्या माध्यमातून झालेल्या मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याचा संशय विरोधकांनी व्यक्त केला होता. निवडणुकीच्या मतमोजणीतही बऱ्याच ठिकाणी तफावत आढळल्याचे आरोप विरोधी पक्षांनी केले होते. त्यामुळे आगामी सर्व निवडणुकांमध्ये ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मारुती भापकर म्हणाले, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये बदल करुन माहिती आयोगाच्या स्वायतत्तेवर घाला घातला आहे. हा कायदा निष्प्रभ केला. तसेच आपल्या देशात निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनव्दारे (ईव्हीएम) मतदान घेऊन निवडणूक प्रक्रिया पार पडते. त्यामध्ये मोठा गडबड घोटाळा व भ्रष्ट्राचार आहे. हे वारंवार प्रकाशात आले आहे. त्यामध्ये एकूणच निवडणूक प्रक्रियेवरती अविश्वास निर्माण होऊन लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर विधानसभेची निवडणूक घेण्याची आमची मागणी आहे. त्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.