Talegaon : तळेगावमधून पूरग्रस्तांसाठी जीवनोपयोगी वस्तूंसह जेवणाची रसद रवाना

नगरसेवक किशोर भेगडे मित्र परिवाराने दिला मदतीचा हात 

एमपीसी न्यूज – माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक किशोर भेगडे मित्र परिवाराच्या वतीने सांगली, कोल्हापूर जिल्हयातील पूरग्रस्तांसाठी कपडे, वैद्यकीय सुविधा अशा जीवनोपयोगी वस्तूंसह जेवणाची रसद रवाना करण्यात आली आहे. पुरी आणि शेंगाचटणीची पाच लाख पाकिटे पहिल्या ट्रकमध्ये पाठवण्यात आली आहेत.

उर्से येथील सूर्योदय कंपनीच्या शेडमध्ये दोन दिवस कंपनीचे कामकाज बंद ठेवून पु-या व शेंगदाणा चटणी बनविण्याच्या कामाला शनिवार (दि. 10) पासून सुरूवात करण्यात आली. माजी नगराध्यक्षा माया भेगडे, नगरसेविका वैशाली दाभाडे, मंगलताई भेगडे, तळेगाव शहर महिला राष्ट्रवादी सरचिटणीस आदिती सोरटे, तळेगाव शहर महिला राष्ट्रवादी उपाध्यक्ष ज्योती शिंदे, लोणावळा शहर महिला राष्ट्रवादी अध्यक्षा मंजुश्री वाघ यांनी स्वतः पु-या बनविण्यास मदत केली. यावेळी नगरसेवक किशोर भेगडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मु-हे, नगरसेवक संतोष भेगडे, माजी सरपंच चंद्रकांत दाभाडे, राकेश घारे, मनोज वाळुंज, अविनाश गराडे, देहूरोड उपाध्यक्ष सचिन भुंबक, समीर आंद्रे, संदेश जाधव, विनय भेगडे, दिलीप राक्षे, पत्रकार गणेश विनोदे आदी उपस्थित होते.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पुराने वेढलेल्या जनतेला धान्य स्वरूपात मदत देणे काहीच उपयोगाचे नाही. त्यामुळे त्यांना जेवण आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंची सध्या आवश्यकता आहे. त्या उद्देशाने पुरी आणि शेंगदाणा चटणीची पाकिटे तयार करण्यात आली आहेत. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या संकल्पनेतून व तळेगांवचे माजी उपनगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक किशोर भेगडे मावळ तालुका मित्र परीवाराच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पूरग्रस्तांना सर्व स्तरातून कपडे, औषधे, धान्य अशा स्वरूपात मदतीचा ओघ सुरू आहे. पण पुराने वेढलेल्या जनतेला तयार भोजन मिळणे महत्वाचे आहे. म्हणूनच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.