Pimpri: ‘आरक्षित जागांना सीमाभिंत न बांधणा-या अधिका-यांची खातेनिहाय चौकशी करा’

महापौर जाधव यांचे आयुक्त हर्डीकर यांना निर्देश 

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेने आरक्षित केलेल्या जागांना सीमाभिंत अथवा तारेचे कुंपन घालण्याच्या सूचना देऊनही अधिका-यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्याची माहिती देखील दिली गेली नाही. त्यामुळे संबंधित अधिका-यांची खातेनिहाय चौकशी करावी. त्यांचे निलंबन करण्यात यावे, असे निर्देश महापौर राहुल जाधव यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत. 

पत्रकारांशी बोलताना महापौर जाधव म्हणाले, शहराचा विकास करण्यासाठी विविध जागांवर आरक्षणे टाकली आहेत. परंतु, बहुतांश आरक्षणाचा महापालिकेकडे ताबा असून देखील त्याचा गैरवापर केला जातो. त्याच्या माध्यमातून काही लोक पैसे कमवितात. त्यामुळे आरक्षित जागांवरील अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. तसेच आरक्षणे ताब्यात घेण्याचे निर्देश दिले होते.

ताब्यात असलेल्या जागांना सिमाभिंत अथवा तारकुंपन करुन महापालिकेच्या मालकीचा फलक लावण्याबाबत 24 ऑगस्टला झालेल्या बैठकीत अधिका-यांना आदेश दिले होते. तथापि, एक महिना उलटला तरी देखील कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यानंतर दोनवेळा मुदतवाढ दिली. मात्र, कारवाई शुन्य आहे.

विकास कामांसाठी आरक्षित केलेल्या जागांपैकी किती जागांना सिमाभिंत, तारकुंपन केले आहे. त्याची आपण सविस्तर माहिती मागविली होती. परंतु, आदेश देऊनही माहिती देण्यात आली नाही. तसेच कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही.  ही गंभीर बाब आहे. त्यामुळे कारवाई न केल्याने खातरजमा करून शहर अभियंता अंबादास चव्हाण तसेच संबंधित अधिका-यांची खातेनिहाय चौकशी करावी. त्यांच्यावर कठोर करवाई करण्यात यावे, असे निर्देश महापौर जाधव यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.