Chikhali News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिखली जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. या योजनेमुळे महापालिका हद्दीत नव्याने जोडल्या गेलेल्या समाविष्ट गावांची पाण्याची मागणी पूर्ण करणे शक्य आहे. योजनेमुळे सेक्टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रावर येणारा भार कमी होऊन शहरातील सर्व भागांना पुरेसा पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महापालिका येथे उद्योग सुविधा कक्ष व औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड क्षेत्रात पोलिस पेट्रोलिंगकरिता स्मार्ट बाईक मोटार सायकल्स हस्तांतरण, ग्रीन मार्शल पथकाकरिता ई-चलन उपकराणाचे वाटप तसेच अग्निशमन दूचाकी वाहनांचे लोकार्पणदेखील करण्यात आले. महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय शिंदे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदी उपस्थित होते.

औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व कक्ष!

शहरातील विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या तथा उद्योग समूहाद्वारे प्राप्त होणाऱ्या सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून शहराच्या विकासात भर घालण्यासाठी समन्वय साधण्याचे कार्य या कक्षामार्फत करण्यात येईल. स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण, शिक्षण प्रकल्पाद्वारे शहराचा शाश्वत विकासासाठी कक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील.

महानगरपालिकेचे विविध उपक्रम, योजना, कार्यक्रम शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, कल्याणकारी योजनाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता तसेच उद्योग समूहाचा या कामात सहभाग वाढविण्याकरिता सामाजिक उत्तरदायित्व कक्ष महत्वपूर्ण ठरणार आहे. कक्षाच्या माध्यमातून खाजगी संस्था तसेच महानगरपालिका यांना एकत्रित आणून नव्या योजना, कल्पना, कार्यक्रम इत्यादींची आखणी आणि त्यांची अंमलबजावणी सुलभ होणार आहे.

उद्योग सुविधा कक्ष वैशिष्ट्ये

शासकीय संस्था आणि उद्योग यांच्यातील संवाद सुनिश्चित करण्याचा उद्योग सुविधा कक्ष पंच तारांकित एक खिडकी सुविधा आहे. पिंपरी चिंचवडमधील व्यापार आणि उद्योगांची वाढ सुलभ करण्यासाठी आणि औद्योगिक प्रतिनिधीत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच महापालिकेच्या उपक्रमात सहभाग वाढविण्यासाठी कक्ष महत्वपूर्ण ठरणार आहे. उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि चेंबर ऑफ कॉमर्स आणि मोठ्या उद्योगांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यात कक्षामुळे मदत होईल.

DCM Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रोईंग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन; सकाळी सात पासून उद्घाटन, भूमिपूजनाचा धडाका सुरू

अग्निशामक मोटार सायकल्सचे हस्तांतरण

पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील अरूंद रस्ते, गल्लीबोळ, मार्केट परिसर, इत्यादी ठिकाणी आग विझविण्यासाठी अग्निशामक जवानास तातडीने व सहजपणे पोहचण्यास या वाहनांमुळे मदत होणार आहे. या वाहनात 20+20 लीटर क्षमतेच्या 2 पाण्याच्या टाक्या आहेत. घटनास्थळी तातडीने पोहोचण्यासाठी रस्त्यावरील वाहतूक बाजूला करण्यासाठीदेखील वाहनांची मदत होणार आहे.

ग्रीन मार्शल पथकाकरिता ई-चलन उपकरणचे वितरण
हे अँड्रॉइड प्रणाली आधारित यंत्र असून डिजिटल पावती,डिजिटल पेमेंट, वाहतूक विभागाच्या वाहन प्रणालीशी सुसंगत आहे. या उपकरणाच्या वापरामुळे दंडाची रक्कम जागेवर प्राप्त होऊन त्याची पावती नागरिकास देण्यात येणार आहे. या उपकरणाचा वापर करणे महापालिकेस सुलभ ठरणार असून कारवाईमध्ये अधिक पारदर्शकता येणार आहे

पिंपरी चिंचवड क्षेत्रात पोलिस पेट्रोलिंगकरिता 50 स्मार्ट मोटारसायकल्सचे हस्तांतरण

शहरामधील वाहतूक कोंडी, गुन्हेगारी व चोऱ्या यांचे पोलिस पथकामार्फत पेट्रोलिंग करण्याकरिता स्मार्ट मोटारसायकल्सचा वापर करण्यात येणार आहे. पोलिस विभागाला कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी या दुचाकी वाहनांची मदत होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सखुबाई गबाजी गवळी उद्यानासमोरील अद्ययावत बहुमजली वाहनतळाचे भूमिपूजन करण्यात आले. या वाहनतळामुळे भोसरी येथून आळंदीकडे जाणारा मुख्य रस्ता बाजारपेठेतील असल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय होणार आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर तळमजला अधिक 3 मजले असे पार्किंग करण्यात येणार आहे. यामध्ये 75 चारचाकी तर 150 दुचाकी वाहने पार्क करण्याची व्यवस्था आहे. वरील मजल्यांवरून ये-जा करण्याच्या दृष्टीने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्वाहकचे नियोजन करण्यात आले आहे.

तळवडे येथील उद्यानाचे उद्घाटन

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील तळवडे येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या उद्यान व जॉगिंग ट्रॅकचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पवार यांनी उद्यानाची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सह शहर अभियंता सतीश इंगळे, कार्यकारी अभियंता सुनील वाघुंडे आदी उपस्थित होते.

तळवडे उद्यान अंदाजे 1 एकरामध्ये विकसित करण्यात आले असून त्यामध्ये 300 मीटर लांबीचे जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. लहान मुलांसाठी खेळण्या, खुली व्यायाम शाळा, लॅन्डस्केपिंग, फलोत्पादनविषयक कामे करणेत आले आहेत.

इको जॉगिंग ट्रॅकचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री पवार यांनी भक्ती-शक्ती चौकातील इको जॉगिंग ट्रॅकचे भूमिपूजन केले. 6 ते 8 मीटर रुंदी असलेले मातीचे जॉगिंग ट्रॅक बनविण्यात आले असून वृक्षारोपण व लॉन तयार करण्यात आले आहे. सोबत खुली व्यायामशाळा व मुलांसाठी खेळण्याची जागा असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.