Baner News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णालयात जाऊन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीची केली विचारपूस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील जेष्ठ नेते, चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आजारी असून त्यांच्यावर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शनिवारी) रुग्णालयात जाऊन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.  डॉक्टरांकडून सर्व माहिती घेतली. आमदार जगताप यांचे बंधू विजय जगताप, शंकर जगताप यांच्याशी चर्चा करून धीर दिला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज केले जाणार होते. पण, आपले एकेकाळचे खंदे समर्थक व आताचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व उद्घाटन कार्यक्रम रद्द केले. कार्यक्रम रद्द करून अजित पवार यांनी थेट बाणेर येथील रुग्णालय गाठले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. भाऊंच्या प्रकृतीची डॉक्टरांकडून माहिती घेतली.

रुग्णालयात उपस्थित असलेले जगताप यांचे बंधू विजय जगताप  यांच्याशी चर्चा केली. शंकर जगताप यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून धीर दिला. काय मदत लागल्यास सांगावे असेही अजितदादा म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर योगेश बहल यावेळी उपस्थित होते. आमदार लक्ष्मण जगताप  आणि अजित पवार यांनी अनेक वर्षे एकत्र काम केले. त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. जगताप यांनी पक्ष बदलला तरी त्यांचे संबंध कायम आहेत. आपला एकेकाळचा  खंदा समर्थक आजारी असल्याचे समजताच अजितदादांनी सर्व कार्यक्रम रद्द करून त्यांची भेट घेतली.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीबद्दल आतापर्यंत कोणतीही माहिती जाहीर करण्यात येत नव्हती. लक्ष्मणभाऊ बाणेर येथील रुग्णालयात दाखल असल्याचे कळताच कार्यकर्त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली होती. भाऊ रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीविषयी भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी माहिती दिली. आमदार लक्ष्मणभाऊ यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. लवकरच भाऊ कार्यकर्त्यांच्या भेटीला समोर येतील,  असे लांडगे यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.