Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार तब्बल तासभर वाहतूक कोंडीत अडकले

एमपीसी न्यूज : शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून पुणे शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडला. सर्वसामान्य पुणेकरांना या पावसाचा मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले तर काही ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. परिणामी ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. याच वाहतूक कोंडीचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील बसला. अजित पवार हे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीत तब्बल एक तास अडकून पडले होते. 

उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार हे औरंगाबाद येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास लोहगाव विमानतळावर आले. तिथून ते भोसले नगर मध्ये असलेल्या घरी जाण्यास निघाले. परंतु या दरम्यान शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. याच वाहतूक कोंडीत अजित पवारांची गाडी देखील अडकली होती.

नगर रस्त्यावरील शास्त्रीनगर चौकात अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा तब्बल तासभर अडकून पडला होता. मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्याच्या प्रयत्नाला अडथळे निर्माण होत होते. वाहतूककोंडी सोडविण्याचा प्रयत्न करताना वाहतूक पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. तब्बल तासाभरानंतर अजित पवारांच्या ताफ्याला मोकळी वाट करून देण्यात आली आणि त्यानंतर ते घराच्या दिशेने निघून गेले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.