Maval : चक्रीवादळामुळे मावळात झालेल्या नुकसानीची उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून पाहणी

Deputy Chief Minister Pawar inspects the damage caused by the cyclone in Maval

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी  निसर्ग चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यात झालेल्या नुकसानीची आज (शुक्रवारी, दि. 5) पाहणी केली. तसेच नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.

यावेळी मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते. आंबी एमआयडीसी परिसरात झालेल्या नुकसानीची उपमुख्यमंत्री पवार यांनी पाहणी केली.

त्यानंतर मावळ तालुक्यातील भोयरे व पवळेवाडी येथील झालेल्या नुकसानीची पाहणी  केली. पवळेवाडी येथील पॉलीहाऊसचीही पहाणी केली.

निसर्ग चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यात अनेक ठिकाणी घरावरील, शाळेवरील पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच विद्युत खांब पडले आहेत. त्यामुळे तालुक्यातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता.

अनेक ठिकाणी झाडे पडल्याने देखील मोठे नुकसान झाले आहे. मावळ तालुक्यात फुलशेती आणि अन्य शेतीसाठी पॉलिहाऊस वापरले जातात. या वादळात पॉलिहाऊसचे देखील नुकसान झाले आहे.

पालकमंत्री   पवार म्हणाले, ‘निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे.

शनिवारी (दि. 6) लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात योग्य ते निर्णय घेवून मदत केली जाणार आहे. राज्य शासनाने केंद्र सरकारकडे मदत मागितली असून केंद्रीय पथक पहाणी करण्यासाठी येणार असल्याचेही पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.