Akurdi : मुदत संपूनही नाट्यगृहाचे काम अपूर्णच, खर्च 60 कोटींवर

ठेकेदारावर कोणतीही दंडात्मक कारवाई नाही

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांची सांस्कृतिक भूक भागविण्याबरोबरच स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मि‌‌ळावे, यासाठी पाच वर्षापूर्वी महापालिकेने प्राधिकरणात सुरू केलेल्या नाट्यगृहाचे काम अद्यापही प्रलंबितच आहे. 37 कोटी 25 लाख रूपयांमध्ये होणाऱ्या या कामाचा खर्च वाढला असून नाट्यगृहातील प्रलंबित कामे करण्यासाठी 23 कोटी 58  लाख रूपयांच्या कामाला बुधवारी  (दि.4) स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. दरम्यान, ठेकेदाराने तीन वर्षात हे काम पूर्ण करणे गरजेचे असतानाही काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. कामाला उशीर झाला म्हणून पालिकेने ठेकेदाराला कोणताही दंड केला नाही.

प्राधिकरणामध्ये नाट्यगृह असावे, यासाठी पालिकेने 2014 मध्ये निविदा प्रक्रिया राबविली. एम. आर. गंगाणी कंपनीच्या मार्फत हे काम केले जात आहे. प्राधिकणातील पेठ क्रमांक 26  मधील पाच हजार चौरस मीटर भूखंडावर हे नाट्यगृह उभारले जात आहे. 37 कोटी 25  लाख रूपयांमध्ये हे काम केले जाणार होते. 2017 मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित होते. 11 जानेवारी 2014 रोजी ठेकेदाराला कार्यरंभ आदेश दिला होता. मात्र, ठेकेदाराने हे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू केले. त्यामुळे तीन वर्षाच्या मुदतीत हे काम पूर्ण झालेच नाही.

महापालिकेने ठेकेदाराला दोनवेळा मुदतवाढ देऊन देखील सद्यस्थितीमध्ये हे काम रखडलेले आहे. खोदकाम करणे, इमारत बांधणे, प्लास्टर करणे, मुख्य सभागृह बांधणे, तीन छोटी सभागृहे बांधणे, इंटेरियर डेकोरेशन करणे अशी कामे यामधून केली जाणार होती.

पाच वर्षापासून नाट्यगृहाचे काम सुरू असल्याने याच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. बुधवारी झालेल्या पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत नाट्यगृहाची उर्वरित कामे करण्यासाठी 23 कोटी 58 लाख रूपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. दरम्यान, ठेकेदाराने दिलेल्या मुदतीत काम पूर्ण केले नाही. तरीही महापालिकेने ठेकेदाराव कोणतीही कारवाई केली नाही.

नाट्यगृह पूर्ण होण्याआधीच नावाचा ठराव मान्य

प्राधिकरणात नाट्यगृह बांधण्यास महापालिकेने 2014  मध्ये सुरूवात केली. हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. मात्र या नाट्यगृहाला प्रख्यात मराठी साहित्यिक व नाटककार कै. ग. दि. माडगूळकर उर्फ ‘गदिमा’ यांचे नाव देण्याचा ठराव काही वर्षांपूर्वीच मान्य करण्यात आला आहे. गदिमा यांच्या नावाचे पुणे जिल्ह्यातील हे पहिले स्मारक ठरणार आहे. त्यामुळे याचा ठराव काही वर्षापूर्वीच पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडून त्याला मान्यता देण्यात आली आहे.

‘ही’ आहेत नाट्यगृहाची वैशिष्ट्ये!

एकाच ठिकाणी दोन नाट्यगृह 900 व 270 आसनक्षमता
तळघरात दुमजली वाहनतळ सुमारे चारशे मोटारी व 265 दुचाकी क्षमता
कलादालन (आर्टगॅलरी)
स्थानिक कलावंतांच्या सरावासाठी स्वतंत्र हॉल
छोटा ‘कॉन्फरन्स हॉल’
नाट्यगृहामागे दोन एकर जागेत ‘लॅन्डस्केप गार्डन’
ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र
संगीत वाद्यांची साधना करणाऱ्यांसाठी मोकळी जागा
मोठे रेस्टाँरंट

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.